झुरिच (स्वित्झर्लंड) : पृथ्वीवरील कार्बन चक्र आणि जागतिक हवामान संतुलित ठेवण्यामध्ये उष्ण कटिबंधीय दलदलीचे प्रदेश आणि पीटलँडस् (कुजलेल्या वनस्पतींचा थर असलेले प्रदेश) महत्त्वाची भूमिका बजावतात. ॲमेझॉन, काँगो आणि आग्नेय आशियातील पाणथळ जागांमध्ये हजारो वर्षांपासून वनस्पतींचे अवशेष साचून राहिले आहेत. या परिसंस्थांनी सुमारे 100 गिगाटन कार्बन स्वतःमध्ये साठवून ठेवला आहे.
मध्य आफ्रिकेतील काँगो खोरे हे जगातील सर्वात मोठ्या कार्बन साठ्यांपैकी एक आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जगाच्या एकूण भूभागाच्या तुलनेत या प्रदेशाचे क्षेत्रफळ केवळ 0.3 टक्के असले, तरी जगातील उष्णकटिबंधीय पीटलँडस्मध्ये असलेल्या एकूण कार्बनपैकी एक-तृतीयांश साठा एकट्या काँगोमध्ये आहे. दुर्गम भाग आणि दळणवळणाच्या साधनांचा अभाव यामुळे या परिसंस्थांचा आतापर्यंत सखोल अभ्यास होऊ शकला नव्हता. अनेक ठिकाणी केवळ पारंपरिक होड्यांच्या साहाय्यानेच पोहोचता येते. त्यामुळे जागतिक हवामानावर त्यांचा नेमका काय परिणाम होतो, हे आतापर्यंत अस्पष्ट होते. गेल्या दशकभरापासून ‘ईटीएच झुरिच’ या संस्थेचे संशोधक काँगो खोऱ्याचा अभ्यास करत आहेत. नुकत्याच ‘नेचर जिओसायन्स’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, संशोधकांनी आफ्रिकेतील सर्वात मोठे कृष्णजल सरोवर ‘लॅक माई नोम्बे’ आणि ‘लॅक तुंबा’ यांवर लक्ष केंद्रित केले. या सरोवरांचे पाणी एखाद्या ‘कडक चहा’प्रमाणे गडद रंगाचे दिसते. आजूबाजूच्या जंगलातील वनस्पतींचे अवशेष आणि माती वाहून आल्यामुळे या पाण्याला हा रंग प्राप्त झाला आहे. संशोधनात असे आढळले आहे की, या सरोवरांमधून मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड वातावरणात उत्सर्जित होत आहे. मात्र, या कार्बनचा उगम धक्कादायक आहे. उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडपैकी जवळपास 40% कार्बन हा हजारो वर्षांपूर्वी साठलेल्या ‘पीट’ ( झशरीं) पासून तयार झाला आहे. रेडिओकार्बन डेटिंगद्वारे शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले की, हा कार्बन आधुनिक नसून प्राचीन आहे. या अभ्यासाचे मुख्य लेखक ट्रॅव्हिस ड्रेक म्हणतात, ‘सरोवराच्या माध्यमातून इतक्या जुन्या काळातील कार्बन बाहेर पडत आहे, हे पाहून आम्हाला आश्चर्य वाटले.’ सह-लेखक मॅटी बार्थेल यांनी याचे वर्णन करताना सांगितले की, ‘थोडक्यात सांगायचे, तर या कार्बनच्या साठ्याला ‘गळती’ लागली आहे, ज्यातून प्राचीन कार्बन निसटून वातावरणात मिसळत आहे.’