Comet 3I/ATLAS | विश्‍वाच्‍या सुरुवातीच्‍या काळाचा साक्षीदार आहे हा धूमकेतू 
विश्वसंचार

Comet 3I/ATLAS | विश्‍वाच्‍या सुरुवातीच्‍या काळाचा साक्षीदार आहे हा धूमकेतू

सूर्यमालेपेक्षा म्‍हातारा : वय १० ते १२ अब्‍ज वर्षे

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : आपल्या सूर्यमालेत दाखल झालेला ३एल/एटीएलएएस (३एल/ॲटलास) हा आंतरधर्मीय धूमकेतू (इंटरस्‍टेलर कॉमेट) हा तब्बल १० ते १२ अब्ज वर्षे जुना असून, त्याची रासायनिक रचना आपल्या सूर्यमालेतील कोणत्याही वस्तूशी जुळत नाही, असा थक्क करणारा खुलासा शास्त्रज्ञांनी केला आहे. प्रसिद्ध 'नेचर' (Nature) या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.

सुमारे १३.८ अब्ज वर्षांपूर्वी झालेल्या 'बिग बँग'नंतर जेव्हा हे विश्व अवघ्या १३% वयाचे होते, तेव्हा या धूमकेतूची निर्मिती झाली असावी. तुलना करायची झाल्यास, आपली पृथ्वी आणि सूर्यमाला अवघ्या ४.५ अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली आहे; म्हणजेच हा धूमकेतू आपल्या सूर्यमालेपेक्षा तिप्पट जुना आहे.

जेम्स वेब आणि हबल दुर्बिणीने टिपले रहस्य

बर्फाळ केंद्र आणि धुळीचे कवच : नासाच्या हबल स्पेस टेलिस्कोपने २१ जुलै २०२५ रोजी या धूमकेतूचे एक दुर्मीळ छायाचित्र टिपले होते, जेव्हा तो पृथ्वीपासून २७७ दशलक्ष मैल अंतरावर होता. यामध्ये या धूमकेतूच्या बर्फाळ केंद्रातून अश्रूच्या आकाराचे धुळीचे कवच बाहेर पडताना दिसत आहे. या धूमकेतूचा व्यास सुमारे १.६ मैल (२.६ किमी) आहे. नासाच्या निरीक्षणानुसार, ३एल/ॲटलासचा जन्म उणे २४३ अंश सेल्सिअस (-243°C) इतक्या कमालीच्या थंड वातावरणात झाला होता.

हायड्रोजन आणि कार्बन आयसोटोप्सचे वेगळेपण

नासाच्या गॉडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरमधील ग्रह वैज्ञानिक आणि मुख्य लेखक मार्टिन कॉर्डिनर यांनी सांगितले की, 'जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप'च्या मदतीने त्यांनी या धूमकेतूवरील हायड्रोजन आणि कार्बनच्या आयसोटोप्सचे गुणोत्तर मोजले. या धूमकेतूच्या पाण्यात आपल्या सूर्यमालेतील इतर धूमकेतूंच्या तुलनेत तब्बल ३० पट जास्त ‘ड्यूटेरियम’ (हायड्रोजनचा एक आयसोटोप) आढळले आहे. यावरून स्पष्ट होते की, ज्या ग्रह प्रणालीमध्ये हा धूमकेतू तयार झाला, तिथले वातावरण आपल्या सूर्यमालेपेक्षा प्रचंड थंड, धातूंचे प्रमाण कमी असलेले आणि अतिनील (अल्‍ट्रा व्‍हायोलेट) तसेच वैश्विक किरणांच्या (कॉस्‍मिक रेज) तीव्र माऱ्याचे होते.

‘परकीय उपग्रह’ नव्हे, नैसर्गिक धूमकेतूच!

गेल्या वर्षी काही संशोधकांनी हा धूमकेतू म्हणजे परग्रहावरील जीवांचे अंतराळ यान (एलियन स्‍पेसक्राफ्‍ट) असावे अशी शंका व्यक्त केली होती. मात्र, कॉर्डिनर यांनी ही शक्यता फेटाळून लावली असून, हा एक नैसर्गिक धूमकेतूच असल्याचे खात्रीशीर पुरावे आता समोर आले आहेत, असे स्पष्ट केले.

जीवनाची मूलद्रव्ये मुबलक

धक्कादायक बाब म्हणजे, इतक्या प्राचीन आणि थंड वातावरणात जन्म होऊनही या धूमकेतूवर कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि सल्फर यांसारखे सेंद्रिय रेणू (ऑरगॅनिक मोल्‍युक्‍युल्‍स) मुबलक प्रमाणात आढळले आहेत. म्हणजेच, विश्वाच्या सुरुवातीच्या काळातही जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे घटक अंतराळात अस्तित्वात होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT