वॉशिंग्टन : ब्लॅकहोल्स म्हणजेच कृष्णविवरांचे गूढ अनेक वर्षांपासून खगोलशास्त्रज्ञांना आहे. पूर्वी या कृष्णविवरांचे अस्तित्व केवळ सिद्धांत रूपातच होते, पण आता ते सिद्धही झालेले आहे. इतकेच नव्हे तर त्यांचे छायाचित्रही उपलब्ध झाले आहे. एखाद्या तार्याचा मृत्यू झाला की त्याचे रूपांतर असे प्रचंड आकर्षण शक्ती असलेल्या कृष्णविवरात होते. त्यांच्या तावडीतून अगदी प्रकाशाचा किरणही सुटत नाही व तो लगेच गडप होतो. त्यामुळेच या कृष्णविवरांचे अंतराळातील अस्तित्व शोधणे कठीण होते; मात्र आता तंत्रज्ञानानेही कमाल केलेली आहे. खगोलशास्त्रज्ञांनी आता इव्हेंट होरायझन टेलिस्कोप (Event Horizon Telescope - EHT) चा वापर करून रेडिओ स्कायचे अनेक वारंवारतेवर (multi- frequency) निरीक्षण करण्याचा नवा मार्ग शोधला आहे आणि याचा अर्थ असा की आपल्याला लवकरच महाकाय कृष्णविवरांचे (supermassive black holes) रंगीत फोटो पाहायला मिळतील.
रेडिओ दुर्बिणी ‘बँड्स’ (frequency bands) च्या स्वरूपात विविध वारंवारतेतील रेडिओ प्रकाश टिपू शकतात. प्रत्येक बँड म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा ‘रेडिओ रंग’ असतो. जर वेगवेगळ्या बँडमध्ये निरीक्षण केले, तर आपण एकत्र करून ‘रेडिओ रंगीत’ प्रतिमा तयार करू शकतो, जणू काही रेडिओ ‘फोटोग्राफी’च. परंतु बहुतेक रेडिओ दुर्बिणी एकाच वेळी फक्त एक बँडवर निरीक्षण करू शकतात.यासाठी वैज्ञानिकांना एकाच वस्तूचे वेगवेगळ्या बँडवर अनेकदा निरीक्षण करावे लागते आणि नंतर त्या प्रतिमा एकत्र कराव्या लागतात.
ही पद्धत स्थिर वस्तूंकरिता योग्य असते, पण अतिशय वेगाने बदलणार्या किंवा अतिशय सूक्ष्म आकाराच्या वस्तूंसाठी ही अचूक कार्य करत नाही. हाच प्रश्न ब्लॅक होलसारख्या वेगाने बदलणार्या द़ृश्यांमध्ये येतो. इव्हेंट होरायझन टेलिस्कोपच्या नवीन पद्धतीमुळे, एकाच वेळी अनेक बँडमध्ये निरीक्षण करणे शक्य झाले आहे. यामुळे खगोलशास्त्रज्ञ ब्लॅक होल्ससारख्या गतिशील वस्तूंचे ‘रंगीत’ रेडिओ प्रतिमांमध्ये रूपांतर करू शकतील. ही क्रांतिकारी प्रगती ब्लॅक होल्सच्या संरचनेची, प्लाझ्मा जेटस्ची आणि स्राव प्रक्रियेची अधिक स्पष्ट माहिती मिळवण्यासाठी मदत करेल.