Muscle Disease Drug | ‘क्लाऊड एआय’च्या मदतीने बनवले स्नायूंच्या गंभीर आजारावर औषध  
विश्वसंचार

Muscle Disease Drug | ‘क्लाऊड एआय’च्या मदतीने बनवले स्नायूंच्या गंभीर आजारावर औषध

अँथ्रोपिक कंपनीने बायोटेक स्टार्टअप घेतले विकत

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर @Prof_Oak_ नावाच्या एका खात्यावरून एक अत्यंत धक्कादायक आणि रंजक घोषणा करण्यात आली आहे. ‘प्रोफेसर ओक’ (हा नावाचा संदर्भ प्रसिद्ध पोकेमोन शोमधील संशोधक ‘प्रोफेसर सॅमुअल ओक’ यांच्यावरून घेतला आहे) हे एक अशा बायोटेक लॅबचे संचालन करत होते, जिथे ते अगदी एकटेच काम करत होते. आता या अनोख्या लॅबला आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘अँथ्रोपिक’ने विकत घेतले आहे. प्रोफेसर ओक यांनी आपल्या X अकाऊंटवरून तीन मोठे खुलासे केले आहेत, ज्यामध्ये अँथ्रोपिकद्वारे त्यांची कंपनी विकत घेणे हा पहिला खुलासा होता. तसेच, अँथ्रोपिकच्या ‘क्लाऊड’ या एआय मॉडेलने त्यांना ‘मिथ्रिल मेडिसिन’च्या संशोधनात कशी मदत केली, हेसुद्धा त्यांनी स्पष्ट केले आहे.

प्रोफेसर ओक यांनी आपल्या ट्विटमध्ये तीन सरप्राइजचा उल्लेख केला आहे. पहिले सरप्राईज : अँथ्रोपिक कंपनीने एकाच व्यक्तीच्या मालकीच्या बायोटेक स्टार्टअपचे अधिग्रहण केले आहे. दुसरे सरप्राईज : ती व्यक्ती इतर कोणी नसून खुद्द ते स्वतः आहेत. तिसरे सरप्राईज : या संपूर्ण प्रवासाबद्दल माहिती देण्यासाठी ते आता समोर आले आहेत. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी पुढे लिहिले, ‘‘होय, तुम्ही अगदी बरोबर विचार करत आहात. गेली ६ वर्षे आपली ओळख हळूहळू उघड केल्यानंतर, आता ‘प्रोफेसर ओक’ म्हणून माझी खरी ओळख समोर आणण्याची हीच योग्य वेळ आहे. आणि हो, येथील वातावरण इतके कंटाळवाणे झाले होते की, माझ्या टाईमलाईनमध्ये थोडा उत्साह आणण्यासाठी मी स्वतःच माझी खरी ओळख सर्वांसमोर उघड केली.’’ या पोस्टनंतर त्यांनी स्वतःची ओळख करून देताना लिहिले, ‘‘माझे नाव कोडी ट्रॅनबार्गर आहे.

मी सोशल मीडियावर प्रामुख्याने ट्विट करतो, परंतु कधीकधी मला औषध विकास आणि बायोटेक कंपन्या सुरू करण्याचे किंवा बनवण्याचे काम करण्यासाठीही वेळ मिळतो.’’ आपल्या मागील अनुभवाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांनी यापूर्वी व्हीसी (Venture Capital), क्रॉसओवर आणि स्टार्टअप जगतात काम केले आहे. खऱ्या आयुष्यात ते इतरत्र काम करत असले तरी, ‘प्रोफेसर ओक’ यांच्या माध्यमातून ते डिजिटल जगतात या क्षेत्रांशी जोडलेले राहिले. कोडी ट्रैनबार्गर यांनी सांगितले की, त्यांनी सुमारे १८ महिन्यांपूर्वी ‘मिथ्रिल मेडिसिन’ नावाच्या कंपनीची सुरुवात केली होती. LAMA2-CMD आणि ECM शी संबंधित इतर अनुवांशिक आजारांवर उपचारासाठी बायस्पेसिफिक अँटीबॉडीज (bsAbs) विकसित करण्याच्या उद्देशाने ही कंपनी सुरू करण्यात आली होती. इतर वैद्यकीय लॅबपेक्षा ‘मिथ्रिल मेडिसिन’ने संशोधनासाठी एक पूर्णपणे वेगळा आणि अनोखा मार्ग अवलंबला होता.

या लॅबमध्ये मानवी कर्मचारी म्हणून केवळ कोडी ट्रैनबार्गर हे एकटेच होते, तर संशोधनातील उर्वरित सर्व तांत्रिक व वैचारिक काम अँथ्रोपिकच्या ‘क्लॉड’ या एआय मॉडेलने केले होते. कोडी ट्रैनबार्गर यांनी अवलंबलेली ही अनोखी पद्धत अत्यंत प्रभावी ठरली आहे. ‘मिथ्रिल मेडिसिन’ या कंपनीने १८ महिन्यांपेक्षा कमी कालावधीतच आपल्या ‘LAMA2’ प्रकल्पांतर्गत उंदरांवर यशस्वी प्रयोग केला आहे. संशोधनादरम्यान, ज्या सात उंदरांना एक विशेष अँटीबॉडी देण्यात आली, त्यांची पकडण्याची शक्ती आणि हाताची ताकद त्या चार उंदरांच्या तुलनेत जवळपास दुप्पट असल्याचे दिसून आले, ज्यांना हे औषध दिले गेले नव्हते. एआय कंपनी ‘अँथ्रोपिक’च्या म्हणण्यानुसार, याच अनोख्या सेटअप आणि प्रक्रियेमुळे मिथ्रिल कंपनीला मस्कुलर डिस्ट्रॉफी म्हणजेच स्नायूंच्या गंभीर आजारावरील उपचाराला केवळ १८ महिन्यांपेक्षा कमी वेळात केवळ एका कल्पनेपासून थेट उंदरांवर यशस्वी चाचणीपर्यंत पोहोचवणे शक्य झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT