वॉशिंग्टन : जागतिक हवामान बदलामुळे जगातील प्रमुख भात उत्पादक प्रदेशांमध्ये तापमान कमालीचे वाढत आहे. हे तापमान गेल्या 9,000 वर्षांच्या मानवी इतिहासात भात शेतीसाठी कधीही नोंदवले गेले नाही इतके जास्त आहे, असा इशारा एका नवीन संशोधनातून देण्यात आला आहे. या अभ्यासानुसार, सध्या पृथ्वीवर ज्या वेगाने तापमानवाढ होत आहे, तो वेग भात पिकाच्या नैसर्गिक उत्क्रांतीच्या वेगापेक्षा तब्बल 5,000 पट अधिक आहे. याचा अर्थ असा की, भात पीक आता त्याच्या ‘थर्मल लिमिट’ म्हणजेच तापमानाच्या अंतिम मर्यादेपर्यंत पोहोचत आहे. ही अशी मर्यादा आहे, ज्यानंतर वाढत्या तापमानाशी जुळवून घेणे या पिकाला सहज शक्य होणार नाही.
फ्लोरिडा म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी येथील मानववंशशास्त्रज्ञ आणि भूगोलतज्ज्ञ तथा या संशोधनाचे मुख्य लेखक निकोलस गॉथियर यांनी सांगितले की, ‘मानव उष्णता-प्रतिरोधक नवीन वाण विकसित करू शकतो किंवा भात शेती नवीन प्रदेशांमध्ये स्थलांतरित करू शकतो. आम्ही मानवी अनुकूलन क्षमतेला कमी लेखत नाही. परंतु, भविष्यातील तापमानवाढ ही भात शेतीवर उपजीविका करणार्या जगातील अब्जावधी लोकांसाठी मोठी अडचण ठरू शकते, हे आपण मान्य केले पाहिजे. आपण या कालावधीत ज्या मर्यादेपर्यंत जुळवून घेऊ शकतो, त्या मर्यादेच्या आपण खूप जवळ पोहोचलो आहोत.
‘ भात हे जगातील निम्म्याहून अधिक लोकसंख्येचे मुख्य अन्न आहे आणि याचे 90 टक्के उत्पादन आशिया खंडात होते. ’वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या अहवालानुसार, काही भात उत्पादक प्रदेशांना आधीच तीव्र उष्णतेचा फटका बसू लागला आहे, ज्यामुळे भाताच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. भात हे जरी उष्णता प्रिय पीक असले, तरीही तापमान 40 अंश सेल्सिअस (104 अंश फॅरेनहाईट) च्या आसपास पोहोचल्यास भात पिकातील प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया पूर्णपणे ठप्प होते. तसेच, अति उष्णतेमुळे परागकणांच्या कार्यक्षमतेवर आणि धान्याच्या वाढीवरही परिणाम होतो. भात हे जास्त पाणी लागणारे पीक असल्याने, पावसाळ्याच्या आणि कोरड्या ऋतूच्या चक्रात होणारे बदल ही मोठी समस्या बनत आहे. याशिवाय, समुद्रपातळी वाढल्याने सखल भागातील भातशेतीत खार्या पाण्याचा शिरकाव होत असून, यामुळे पीक नष्ट होऊ शकते.