वॉशिंग्टन : या हिवाळ्यात रात्रीच्या वेळी आकाशात आग्नेय दिशेला पाहिले असता मृग नक्षत्राचा पट्टा, व्याध आणि रोहिणी यांसारखे तेजस्वी तारे दिसतात. मात्र, याच गर्दीच्या थोड्या वरच्या बाजूला ‘पर्सीयस’ नावाचे एक शांत नक्षत्र आहे. साध्या डोळ्यांना फारसे काही दिसत नसले, तरी याच नक्षत्राच्या कुशीत तार्यांच्या जन्माची एक अद्भुत आणि स्फोटक प्रक्रिया सुरू असल्याचे शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे.
पर्सीयस मॉलिक्युलर क्लाऊडमध्ये NGC 1333 नावाची एक तेजोमेघ (नेब्युला) आहे, ज्याला शास्त्रज्ञ प्रेमाने ‘एम्बि-यो नेब्युला’ म्हणतात. येथे अनेक तरुण आणि उष्ण तार्यांचा जन्म होत आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, शास्त्रज्ञांनी ‘ SVS 13’ नावाच्या एका नवजात तार्यातून बाहेर पडणार्या ऊर्जेच्या लोटांचे (Jets) आतापर्यंतचे सर्वात तपशीलवार आणि 3डी (3 D) फोटो प्रसिद्ध केले आहेत. चिलीमधील ‘अटाकामा लार्ज मिलिमीटर/सबमिलिमीटर अॅरे’ (ALMA) या शक्तिशाली रेडिओ टेलिस्कोपच्या साहाय्याने हे संशोधन करण्यात आले आहे.
‘नेचर अॅस्ट्रॉनॉमी’ या मासिकात प्रसिद्ध झालेल्या या माहितीनुसार: नवजात तार्यातून बाहेर पडणार्या ऊर्जेमध्ये 400 हून अधिक अतिशय पातळ आणि कमानदार ‘रिंग्ज’ (SVS) आढळल्या आहेत. ज्याप्रमाणे झाडाच्या खोडावरील वर्तुळांवरून त्याचे वय कळते, त्याचप्रमाणे या प्रत्येक रिंगवरून तार्याने गेल्या अनेक दशकांत किती वेळा ऊर्जा उत्सर्जित केली, याचा हिशेब लावता येणार आहे. विशेष म्हणजे, यातील सर्वात तरुण रिंग ही 1990 च्या दशकात डतड 13 प्रणालीमध्ये दिसलेल्या तेजस्वी स्फोटाशी जुळते.
हे संशोधन खगोलशास्त्रातील एका जुन्या सिद्धांताला पुष्टी देते. नवजात तारे त्यांच्या सभोवतालचा वायू आणि धूळ ‘खातात’ (स्वतःकडे खेचतात) आणि त्यानंतर प्रचंड वेगाने ऊर्जेचे स्फोट घडवून आणतात. जेव्हा मोठ्या प्रमाणात वायू तार्यावर पडतो, तेव्हा त्याच्या वेगात आणि ऊर्जेत अचानक बदल होतो, ज्यामुळे अशा रिंग तयार होतात. आपल्या सूर्यमालेच्या जवळ असलेल्या या भागात तार्यांचा जन्म कसा होतो, हे समजून घेण्यासाठी ही नवी माहिती अत्यंत मोलाची ठरणार आहे.