विश्वसंचार

एलियन्सबरोबर तीन महिने राहिल्याचा दावा

Arun Patil

वॉशिंग्टन : एलियन्स म्हणजेच परग्रहवासी आहेत की नाहीत याबाबत अद्याप विज्ञानाने ठामपणे काहीही सांगितलेले नाही. मात्र, अंतराळाच्या या अफाट पसार्‍यात केवळ पृथ्वी नामक ग्रहावरच जीवसृष्टी असेल असे म्हणणे हे विहिरीलाच जग मानणार्‍या बेडकाच्या 'कूपमंडूक' वृत्तीसारखेच ठरेल! जगभरातून अनेकांनी 'यूफो' म्हणजेच 'उडत्या तबकड्या' पाहिल्याचे दावे केलेले आहेत. काहींनी तर चक्क एलियन्स पाहिल्याचेही दावे केले आहेत. काही महिन्यांपूर्वीच मेक्सिकोच्या संसदेतही अशा कथित एलियन्सच्या दोन ममी दाखवण्यात आल्या होत्या. आता अमेरिकेच्या सैन्यदलातील हेलिकॉप्टरचा माजी पायलट असलेल्या एका व्यक्तीने आपण तीन महिने एलियन्ससोबत राहिलो होतो असा दावा केला आहे.

या माणसाचे नाव एलेक्स कोलियर. त्याने सांगितले की तो बालपणी 92 दिवस म्हणजेच सुमारे तीन महिने एलियन्ससोबत राहिला होता. 1980 च्या दशकात तो दुसर्‍यांदा 'अँड्रोमेडियन्स' नावाच्या एलियन प्रजातीच्या संपर्कात आला होता. त्यांनी स्वप्नांच्या माध्यमातून त्याच्याशी संवादही साधल्याचा त्याचा दावा आहे. त्याची दोन एलियन्ससोबत भेट झाली. तो यापूर्वी 1960 मध्ये एलियन्सच्या संपर्कात आला होता. त्यावेळी तो आजोबांच्या घरी चुलत भावंडांबरोबर लपाछपी खेळत होता. तो मक्याच्या शेतात जाऊन लपला त्यावेळी ही घटना घडली.

त्याला केवळ इतकेच आठवते की तो तिथे झोपला होता. ज्यावेळी त्याने डोळे उघडले त्यावेळी तो एका अंतराळयानात होता. तिथे त्याला एलियन्ससह बोलण्यासाठी एक बेल्ट लावण्यात आला होता. तो तिथे तीन महिने राहिला. या दरम्यान एलियन्सनी त्याच्याशी चांगले वर्तन केले. त्यांनी त्यांची संस्कृती व इतिहासाबाबत सांगितले. या तीन महिन्यांत त्याने अनेक ग्रह व उच्च मितींचा प्रवास केला. त्यानंतर त्याला त्याच्या आजोबांच्या घरी परत सोडण्यात आले.

SCROLL FOR NEXT