मंगळावर आढळले शहराइतके मोठे ‘फुलपाखरू’ युरोपियन  Pudhari File Photo
विश्वसंचार

मंगळावर आढळले शहराइतके मोठे ‘फुलपाखरू’ युरोपियन

स्पेस एजन्सीने प्रसिद्ध केले चित्तवेधक फोटो

पुढारी वृत्तसेवा

पॅरिस : मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर लाखो वर्षांपूर्वी कोरले गेलेले एखाद्या शहराच्या आकाराचे एक अजस्र ‘फुलपाखरू’ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. युरोपियन स्पेस एजन्सीच्या (ESA) शास्त्रज्ञांनी या विवराचे नवीन आणि स्पष्ट फोटो प्रसिद्ध केले आहेत. दगडांची दोन गुळगुळीत पंख लाभलेला हा मंगळावरील ‘कीटक’ म्हणजे या लाल ग्रहाच्या हिंसक आणि पाण्याने भरलेल्या भूतकाळाची आठवण करून देणारा एक पुरावा आहे.

हे फुलपाखरू म्हणजे प्रत्यक्षात एक ‘असममित इम्पॅक्ट क्रेटर’ (Asymmetrical Impact Crater) आहे. कोट्यवधी वर्षांपूर्वी एक महाकाय लघुग्रह मंगळावर अत्यंत कमी कोनातून आदळल्यामुळे हा आकार तयार झाला. हे विवर मंगळाच्या उत्तरेकडील ‘इडेयस फॉसे’ या डोंगराळ आणि ज्वालामुखीय प्रदेशात स्थित आहे. हे विवर पूर्व-पश्चिम 20 कि.मी. आणि उत्तर-दक्षिण 15 कि.मी. लांब आहे. हे विवर इतके मोठे आहे की, त्यात अमेरिकेतील मॅनहॅटन बेट सहज सामावू शकेल.

सौरमालेतील बहुतेक विवरे गोलाकार असतात आणि आदळल्यानंतर ढिगारा सर्व बाजूंनी सारखा पसरतो. मात्र, हा लघुग्रह एका तिरक्या कोनातून आदळल्याने ढिगार्‍याचे वाटप असमान झाले. युरोपियन स्पेस एजन्सीच्या मते, ‘धडकेमुळे माती आणि दगडांचे दोन वेगळे थर उत्तर आणि दक्षिण दिशेला फेकले गेले, ज्यामुळे उंचावलेल्या जमिनीचे दोन विस्तारलेले ‘पंख’ तयार झाले. या विवराचा तळ एखाद्या अक्रोडसारखा अनियमित आकाराचा दिसतो. युरोपियन स्पेस एजन्सीच्या ‘मार्स एक्सप्रेस’ या ऑर्बिटरने गोळा केलेल्या टोपोग्राफिकल डेटाच्या आधारे ही चित्रे डिजिटल पद्धतीने तयार करण्यात आली आहेत.

2003 पासून हे यान मंगळाचे निरीक्षण करत आहे. शास्त्रज्ञांनी या डेटाचा वापर करून एक छोटा व्हिडीओ देखील तयार केला आहे, जो आपल्याला हेलिकॉप्टरमधून हे विवर कसे दिसेल याचा अनुभव देतो. अशा प्रकारचे फुलपाखराच्या आकाराचे विवर विश्वात अत्यंत दुर्मीळ मानले जातात. मंगळावर याआधी 2006 मध्ये ‘हेस्पेरिया प्लॅनम’ भागात असेच एक विवर आढळले होते. मात्र, नवीन फोटोंमधील ‘इडेयस फॉसे’ येथील विवर अधिक स्पष्ट आणि भव्य दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT