टोकियो ः जपानमधील टोयोआके शहराने एक अनोखा प्रस्ताव मांडला आहे, ज्यामुळे ऑनलाईन व्यसन आणि स्क्रीन टाईमशी संबंधित आरोग्य समस्या कमी करता येतील. या प्रस्तावानुसार, शहरातील सर्व नागरिकांना दररोज जास्तीत जास्त दोन तास स्मार्टफोन वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे. अर्थातच याला नागरिकांचा विरोध होत आहे!
शहर अधिकार्यांनी सांगितले की, स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे झोपेच्या समस्यांसह अनेक मानसिक आणि शारीरिक त्रास वाढत आहेत. या धोक्यांना आळा घालणे हा या प्रस्तावाचा मुख्य उद्देश आहे. टोयोआके शहराचे महापौर मसाफुमी कोकी यांनी या प्रस्तावाला नगर परिषदेत चर्चेसाठी सादर केले आहे. जर याला मंजुरी मिळाली, तर हा नियम ऑक्टोबरपासून लागू केला जाईल. जपानमध्ये अशा प्रकारचा हा पहिलाच सामुदायिक स्तरावरील नियम मानला जात आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आणि लहान मुलांना रात्री 9 वाजल्यानंतर स्मार्टफोन आणि टॅब्लेटचा वापर बंद करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, तर किशोरवयीन आणि प्रौढांसाठी रात्री 10 वाजल्यानंतर फोनचा वापर न करण्याची सूचना आहे. या नियमाची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो बंधनकारक नाही. म्हणजेच, जर कोणी हा नियम पाळला नाही, तर त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. यामागचा उद्देश लोकांना जागरूक करणे हा आहे. सुमारे 69 हजार लोकसंख्या असलेल्या टोयोआके शहरात या प्रस्तावानंतर केवळ चार दिवसांत 83 फोन कॉल आणि 44 ईमेल आले. त्यापैकी 80% लोकांनी हा नियम त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचे सांगितले. काहींनी तर हा नियम पूर्णपणे अव्यवहार्य असल्याचे म्हटले आहे. जपानमध्ये स्क्रीन टाईमवर मर्यादा घालण्याचा हा पहिलाच प्रयत्न नाही. यापूर्वी, 2020 मध्ये जपानच्या पश्चिम भागातील एका शहराने मुलांना आठवड्याच्या दिवशी फक्त एक तास आणि सुट्ट्यांमध्ये 90 मिनिटे व्हिडीओ गेम खेळण्याचा सल्ला दिला होता.