Chrysalis Spacecraft | तब्बल 400 वर्षांच्या प्रवासासाठी बनणार ‘क्रिसॅलिस’ यान Pudhari File Photo
विश्वसंचार

Chrysalis Spacecraft | तब्बल 400 वर्षांच्या प्रवासासाठी बनणार ‘क्रिसॅलिस’ यान

अभियंत्यांनी केली एका भव्य अंतराळयानाची रचना

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अभियंत्यांनी एका अशा भव्य अंतराळयानाची रचना केली आहे, जे सुमारे 2,400 लोकांना आपल्या सूर्यमालेच्या सर्वात जवळच्या ताराप्रणाली ‘अल्फा सेंटॉरी’कडे एकतर्फी प्रवासासाठी घेऊन जाऊ शकते. ‘क्रिसॅलिस’ (Chrysalis) नावाचे हे यान 40 लाख कोटी किलोमीटरचा (25 ट्रिलियन मैल) हा प्रवास सुमारे 400 वर्षांत पूर्ण करू शकेल, असे अभियंत्यांनी आपल्या प्रकल्प अहवालात म्हटले आहे. याचाच अर्थ, या यानातील अनेक संभाव्य प्रवाशांना व त्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही आपले संपूर्ण आयुष्य यानावरच घालवावे लागेल.

या प्रकल्पाने ‘प्रोजेक्ट हायपेरिअन डिझाईन कॉम्पिटिशन’मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही स्पर्धा आंतरतारकीय (interstellar) प्रवासासाठी अनेक पिढ्यांसाठीच्या काल्पनिक यानांची रचना करण्याकरिता आयोजित केली जाते. क्रिसॅलिसची रचना अशा प्रकारे केली आहे की, ते अनेक पिढ्यांच्या मानवी वस्तीला आश्रय देऊ शकेल. अल्फा सेंटॉरी ताराप्रणालीमध्ये प्रवेश केल्यानंतर, हे यान प्रवाशांना ‘प्रॉक्सिमा सेंटॉरी बी’ या ग्रहाच्या पृष्ठभागावर उतरवू शकेल. हा ग्रह पृथ्वीच्या आकाराचा असून, तो संभाव्यतः राहण्यायोग्य मानला जातो.

या प्रवासाचा कालावधी 400 वर्षांचा असल्याने, ज्या पिढीने पृथ्वीवरून प्रवास सुरू केला असेल, ती पिढी कधीही यानाच्या बाहेरचे जग पाहू शकणार नाही. त्यांच्या पुढच्या अनेक पिढ्यांचा जन्म आणि मृत्यू यानावरच होईल. यानाची रचना आणि त्यावरील जीवनशैली अत्यंत विचारपूर्वक तयार करण्यात आली आहे. यानावर चढण्यापूर्वी, सुरुवातीच्या पिढीतील रहिवाशांना त्यांचे मानसिक आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी अनेक वर्षे अंटार्क्टिकामधील एकांतवासात राहून जुळवून घ्यावे लागेल. हे यान सैद्धांतिकद़ृष्ट्या 20 ते 25 वर्षांत बांधले जाऊ शकते. सतत फिरत राहिल्यामुळे यानामध्ये कृत्रिम गुरुत्वाकर्षण टिकवून ठेवले जाईल.

तब्बल 58 किलोमीटर (36 मैल) लांबीचे हे यान एका आत एक अशा रचलेल्या रशियन बाहुलीप्रमाणे असेल, ज्यामध्ये मध्यवर्ती भागाभोवती अनेक थर असतील. यानाच्या केंद्रस्थानी प्रवाशांना प्रॉक्सिमा सेंटॉरी बी ग्रहावर नेण्यासाठीची छोटी याने (shuttles) आणि क्रिसॅलिसची संपूर्ण संपर्क यंत्रणा असेल. मध्यवर्ती भागाच्या सर्वात जवळचा थर अन्न उत्पादनासाठी समर्पित असेल. येथे नियंत्रित वातावरणात वनस्पती, बुरशी, सूक्ष्मजंतू, कीटक आणि पशुधन यांचे संगोपन केले जाईल. जैवविविधता टिकवण्यासाठी उष्णकटिबंधीय आणि बोरियल (थंड प्रदेशातील) जंगलांसारखे वेगवेगळे पर्यावरण राखले जाईल.

यानाच्या रहिवाशांसाठी उद्याने, शाळा, रुग्णालये आणि ग्रंथालये यांसारख्या सार्वजनिक जागा या थरात असतील. पुढील थरामध्ये प्रत्येक कुटुंबासाठी स्वतंत्र घरे असतील, जी हवा खेळती ठेवणारी यंत्रणा आणि उष्णता नियंत्रक उपकरणांनी (heat exchangers) सुसज्ज असतील. या सर्व स्तरांना ऊर्जा पुरवण्यासाठी न्यूक्लियर फ्यूजन रिअ‍ॅक्टरचा (अणुऊर्जा संलयन) वापर केला जाईल. सध्या ही केवळ एक संकल्पना असली, तरी भविष्यात मानवाला आंतरतारकीय प्रवासासाठी सक्षम बनवण्याच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वाचे आणि दूरद़ृष्टीचे पाऊल मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT