100 किलोमीटरवरून मानवी चेहर्‍याचे तपशीलही टिपणारा चिनी उपग्रह 
विश्वसंचार

100 किलोमीटरवरून मानवी चेहर्‍याचे तपशीलही टिपणारा चिनी उपग्रह

Chinese satellite : दुर्बिणींच्या क्षमतेपेक्षा 100 पट अधिक स्पष्टता

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग ः चीनमधील शास्त्रज्ञांनी एक असा उपग्रह विकसित केला आहे, जो प्रगत लेसर-इमेजिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने 100 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरूनही मानवी चेहर्‍याचे तपशील स्पष्टपणे टिपू शकतो. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालानुसार, या तंत्रज्ञानामुळे पारंपरिक हेरगिरी कॅमेरे आणि दुर्बिणींच्या क्षमतेपेक्षा 100 पट अधिक स्पष्टता मिळू शकते. विशेषतः या नव्या तंत्रज्ञानामुळे परदेशी उपग्रहांचे निरीक्षण अतिशय उच्च स्तरावर करणे शक्य होणार आहे.

चायनीज अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या एअरोस्पेस इन्फॉर्मेशन रिसर्च इन्स्टिट्यूटमधील संशोधकांनी हा शोध लावला असून, त्यांचे निष्कर्ष चायनीज जर्नल ऑफ लेझर्स (खंड 52, अंक 3) मध्ये प्रकाशित झाले आहेत. या संशोधनांतर्गत, उत्तर-पश्चिम चीनमधील छिंगहाई तलावाच्या पलीकडे या नव्या प्रणालीची चाचणी घेण्यात आली. हा प्रगत लेसर रडार तंत्रज्ञानाचा एक प्रकार असलेल्या सिंथेटिक अपर्चर लिडार (एसएसएल) तंत्रावर आधारित आहे. यामुळे 2 डी किंवा 3 डी प्रतिमा तयार करता येतात. यापूर्वी वापरल्या जाणार्‍या ‘एसएएल’ प्रणालींमध्ये मायक्रोवेव्ह विकिरण वापरले जात होते, जे कमी रिझोल्यूशन निर्माण करतात. मात्र, ‘एसएएल’ प्रणाली ऑप्टिकल तरंगलांबीचा वापर करते, जी मायक्रोवेव्हपेक्षा लहान असल्याने अधिक स्पष्ट प्रतिमा मिळतात.

चाचणीदरम्यान, 101.8 किलोमीटर (63.3 मैल) अंतरावर असलेल्या परावर्तक प्रिझमच्या समूहांकडे ही यंत्रणा लक्ष्यीत करण्यात आली. आश्चर्यकारक म्हणजे, या उपकरणाने केवळ 1.7 मिलिमीटर (0.07 इंच) एवढे बारकावे टिपले आणि अंतर मोजण्यात 15.6 मिलिमीटर (0.61 इंच) इतकी अचूकता साधली. हा शोध अंतराळ निरीक्षण, हेरगिरी आणि संरक्षण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT