Chinese Humanoid Robot | चिनी ह्युमनॉईड रोबो आता जागतिक भरारी घेणार 
विश्वसंचार

Chinese Humanoid Robot | चिनी ह्युमनॉईड रोबो आता जागतिक भरारी घेणार

अमेरिकन कंपनी ’ओपन माईंड’ देणार मोठी साथ

पुढारी वृत्तसेवा

सिलिकॉन व्हॅली : चीनमधील ह्युमनॉईड (मानवासारखे दिसणारे) रोबो बनवणार्‍या कंपन्या आता जागतिक बाजारपेठेत आपले पाय रोवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवेश करण्याचे आव्हान पेलण्यासाठी अमेरिकेतील ‘ओपन माईंड’ ही कंपनी पुढाकार घेत आहे. ‘ओपन माईंड’ने ‘ओएम1’ नावाचे एक ओपन-सोर्स, एआय-नेटिव्ह ऑपरेटिंग सिस्टीम विकसित केले आहे, जे या चिनी कंपन्यांसाठी जागतिक बाजारपेठेचे प्रवेशद्वार ठरणार आहे.

‘ओपन माईंड’चे सीईओ आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातील प्राध्यापक जॅन लिपहार्ट यांच्या मते, रोबोटिक्सच्या हार्डवेअरमध्ये चीन सध्या अमेरिकेपेक्षा पुढे आहे. तिथली मजबूत सप्लाय चेन आणि कंपन्यांमधील स्पर्धा यामुळे नवनवीन मॉडेल्स वेगाने विकसित होत आहेत. ‘ओपन माईंड’ सध्या युनिट्री रोबोटिक्स, युबीटेक, एजीबॉट यांसारख्या मोठ्या चिनी कंपन्यांसोबत काम करत असून, या कंपन्या आता चीनबाहेर रोबोट विक्रीच्या तयारीत आहेत. ‘ओपन माईंड’ची ‘ओएम1’ ही ऑपरेटिंग सिस्टीम अत्यंत प्रगत आहे.

हार्डवेअर-अग्नोस्टिक : ही सिस्टीम कोणत्याही एका विशिष्ट डिझाईनवर अवलंबून नाही. ती चार पायांचे रोबोट, ह्युमनॉईडस्, चाकांचे रोबोट आणि ड्रोन्समध्येही वापरता येते.

मल्टिमोडल एआय : हा रोबो कॅमेरा (व्हिजन), आवाज (ऑडिओ) आणि अवकाशातील माहिती (स्पेशल डेटा) एकाच वेळी समजून निर्णय घेऊ शकतो. यामुळे रोबोटची ‘विचार करण्याची’ आणि ‘प्रतिक्रिया देण्याची’ क्षमता वाढते. ‘ओएम1’चा भर औद्योगिक रोबोंवर नसून, मानवांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणार्‍या रोबोंवर आहे. अ‍ॅमेझॉनसारख्या कंपन्या आधीच वेअरहाऊस रोबोटिक्समध्ये पुढे असल्याने, ‘ओपन माईंड’ रिटेल स्टोअर्स, रुग्णालये आणि शाळांमध्ये काम करू शकणार्‍या रोबोंवर लक्ष केंद्रित करत आहे.

जिथे मानवांसोबत ताळमेळ राखणे आवश्यक आहे, तिथे या स्मार्ट सॉफ्टवेअरची गरज भासणार आहे. चिनी कंपन्यांना अमेरिकन बाजारपेठेत तांत्रिक अडचणींसोबतच कायदेशीर नियमांचाही सामना करावा लागतो. जर सॉफ्टवेअर अमेरिकेत बनलेले आणि तिथल्याच सर्व्हरवर होस्ट केलेले असेल, तर डेटा सुरक्षिततेचे प्रश्न सुटणे सोपे जाते. तसेच, ‘ओपन माईंड’चे मार्केटिंग प्रमुख गेविन वोंग यांच्या मते, आशियाई आणि पाश्चात्य बाजारपेठेतील मार्केटिंगमध्ये मोठा फरक आहे. त्यामुळे या कंपन्यांना जागतिक ब्रँड बनवण्यासाठी ‘ओपन माईंड’ मदत करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT