बीजिंग : एक काळ असा होता, जेव्हा लोक रोबोला फक्त चित्रपटांमध्ये पाहून ती निव्वळ एक कल्पना आहे, असे समजत असत. पण आता ते पूर्णपणे सत्यात उतरत आहे. चीनमधील इलेक्ट्रिक व्हेईकल कंपनी ‘एक्सपेंग’ने बुधवारी आपला नवीन ‘आयर्न ह्युमनॉईड रोबो’ लाँच केला. हा रोबोट तब्बल 80 टक्के मानवासारखा आहे. वास्तविक पाहता, हा दिसण्यात आणि चालण्यात अगदी माणसासारखाच भासतो. ‘एक्सपेंग’ने या रोबोला त्यांच्या 2025 एआय डे कार्यक्रमात सादर केले, जिथे त्याने व्यासपीठावर मानवांप्रमाणे कॅटवॉक करून सर्वांना चकित केले. या रोबोमधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि बायोनिक तंत्रज्ञान यामुळे भविष्यातील जगाची झलक दिसते.
‘एक्सपेंग’ चा नवीन ‘आयर्न रोबो’ पूर्णपणे मानवासारख्या डिझाईनवर आधारित आहे. याची उंची 178 सेमी आणि वजन 70 किलोग्रॅम आहे. कंपनीचे चेअरमन आणि सीईओ हे श्याओपेंग यांच्या मते, रोबोची चाल माणसांसारखी बनवण्यासाठी अभियंत्यांनी रोबोच्या पायाच्या बोटांमध्ये पॅसिव्ह मुव्हमेंट सिस्टीम जोडली आहे. यामुळे त्याची चाल हलकी आणि संतुलित वाटते. यामध्ये बायोनिक स्पाईन (लवचिक पाठीचा कणा), लवचिक स्नायू आणि लवचिक त्वचा देखील देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, रोबोच्या डोक्यावर थ्रीडी कर्व्हड डिस्प्ले आहे, ज्यामुळे तो भावना दर्शवू शकतो.
या रोबोच्या हातांमध्ये ‘22 डिग्री ऑफ फ्रीडम’ नावाच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे तो माणसांप्रमाणे लवचिक आणि नैसर्गिक पद्धतीने हालचाल करू शकतो. आयर्न रोबोला केवळ मानवी शरीरच नाही, तर जणू काही मानवी मेंदूही देण्यात आला आहे. या रोबोमध्ये ‘एक्सपेंग’च्या ‘व्हिजन-लँग्वेज-अॅक्शन (व्हीएलए) मॉडेलची दुसरी पिढी वापरली आहे. कंपनीने यात स्वतःच्या तीन ट्युरिंग एआय चिप्सचा वापर केला आहे. या चिप्सच्या मदतीने रोबोला 2,250 टॉप्स इतकी प्रोसेसिंग पॉवर मिळते.
यामुळे ‘आयर्न रोबो’ संवाद साधणे, चालणे, वस्तू ओळखणे आणि संवाद साधणे यांसारखी कठीण कामे करू शकतो. या रोबोमध्ये सॉलिड स्टेट बॅटरी वापरली आहे. ‘एक्सपेंग’चे म्हणणे आहे की, ‘आयर्न रोबो’ केवळ चांगल्या प्रकारे चालू शकत नाही, तर तो माणसांशी संवाद साधू शकतो आणि त्यांच्यासोबत मिळून काम करण्यासही सक्षम आहे. ‘एक्सपेंग’चा हा ‘आयर्न रोबो’ सुरुवातीला व्यावसायिक क्षेत्रात वापरण्यासाठी बनवला जाईल. कंपनीने रोबोसोबतच त्याचे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट देखील लाँच केले आहे. आता जगभरातील डेव्हलपर्स या रोबोटसाठी अॅप्लिकेशन्स तयार करू शकतील. कंपनीने सांगितले आहे की, या रोबोचे पुढील वर्षापासून मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू होईल.