विश्वसंचार

चीनमध्ये एकेकाळी वावरत होते आखूड सोंडेचे टापीर

Arun Patil

बीजिंग : चीनमध्ये दोन हजार वर्षांपूर्वी टापीर नावाचे गवत खाणारे प्राणी अस्तित्वात होते. सध्या हे प्राणी चीनमध्ये नसले तरी दक्षिण व मध्य अमेरिकेतील तसेच आग्नेय आशियातील जंगलांमध्ये त्यांच्या काही प्रजाती आढळतात. या प्राण्यांचे शरीर डुकरासारखे असते, मात्र तोंडावर आखूड सोंड असते. चीनच्या शिआ येथील हान राजवंशाच्या शाही मकबर्‍यांमध्ये या पशूंचे सांगाडे सापडले आहेत. शिआन येथील चौथ्या चिनी पुरातत्त्व परिषदेत पश्चिम हान राजवंशाचा सम्राट वेंडी याच्या काळातील मकबर्‍यांमधून मिळालेल्या सांगांड्यांची माहिती देण्यात आली.

या परिषदेत पुरातत्त्व संशोधकांनी सांगितले की उत्खननात 23 प्राण्यांचे सांगाडे सापडले. त्यामध्ये वेगवेगळ्या अकरा प्रजातीच्या प्राण्यांचा समावेश आहे. त्यामध्येच टापीरचा समावेश आहे. या प्राण्याला प्राचीन चीनमध्ये 'जादूचा प्राणी' म्हटले जात असे. हा प्राणी स्वप्ने पाहतो असेही त्या काळात मानले जात असे. टापीरकडे सर्वसाधारणपणे 'संरक्षक प्राणी' म्हणून पाहिले जाई. 'के10' नावाच्या एका मकबर्‍यात दोन मीटरपेक्षाही अधिक लांबीच्या टापीरचा संपूर्ण सांगाडा सापडला. पशू पुरातत्त्व संशोधक हू सोंगमेई यांनी सांगितले की टापीरमध्ये काही अनोखी वैशिष्ट्ये होती. दोन हजार वर्षांपूर्वीच तो चीनमधून लुप्त झाला. एके काळी उत्तर चीनमध्ये हे प्राणी अस्तित्वात होते.

SCROLL FOR NEXT