E-waste Gold Extraction | ई-कचर्‍यातून सोने काढण्याची चिनी किमया! Pudhari File Photo
विश्वसंचार

E-waste Gold Extraction | ई-कचर्‍यातून सोने काढण्याची चिनी किमया!

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : सध्याच्या काळात ई-कचरा हे जगासमोर मोठे संकट मानले जात असताना चीनने या संकटाचे संधीत रूपांतर केले आहे. चिनी शास्त्रज्ञांनी इलेक्ट्रॉनिक कचर्‍यातून सोने काढण्याची एक अशी स्वस्त, पर्यावरणपूरक आणि वेगवान पद्धत शोधून काढली आहे, ज्यामुळे सोन्याचे उत्पादन आंतरराष्ट्रीय बाजारभावापेक्षा चक्क एक तृतीयांश किमतीत करणे शक्य होणार आहे.

या नवीन तंत्रज्ञानाने सर्वांना चकित केले आहे. अहवालानुसार, या पद्धतीने एक औंस सोने काढण्याचा खर्च केवळ 1,455 अमेरिकन डॉलर येतो. जानेवारी 2026 च्या आंतरराष्ट्रीय बाजारभावाशी (सुमारे 4,472 डॉलर प्रति औंस) तुलना केल्यास, ही किंमत बाजारभावाच्या 30 टक्क्यांहून कमी आहे. म्हणजेच कबाडातून सोने काढणे हा आता एक प्रचंड फायदेशीर व्यवसाय ठरणार आहे. ‘गुआंगझू इन्स्टिट्यूट ऑफ एनर्जी कन्व्हर्जन’ आणि ‘साऊथ चायना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी’च्या संशोधकांनी हे यश मिळवले आहे.

हे तंत्रज्ञान जुन्या मोबाईलचे सीपीयू आणि सर्किट बोर्डवर वापरले जाते. सोने वेगळे करण्यासाठी 20 मिनिटांपेक्षाही कमी वेळ लागतो. हे कचर्‍यातील 98.2 टक्के सोने आणि 93.4 टक्के पॅलेडियम काढण्यास सक्षम आहे. यासाठी कोणत्याही मोठ्या यंत्रसामग्रीची किंवा उष्णतेची गरज नाही. ही प्रक्रिया सामान्य तापमानावर पार पडते. साधारणपणे सोन्याच्या खाणींमधून उत्खनन करताना पर्यावरणाचे मोठे नुकसान होते आणि विषारी रसायनांचा वापर केला जातो. मात्र, या नवीन पद्धतीत शास्त्रज्ञांनी ‘सेल्फ कॅटालिटिक’ तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

यात पोटॅशियम पेरोक्सीमोनोसल्फेट आणि पोटॅशियम क्लोराईडच्या मिश्रणाचा वापर होतो, जे पारंपरिक सायनाइड पद्धतीपेक्षा 93 टक्के स्वस्त आहे आणि यामुळे प्रदूषणही अत्यंत कमी होते. चीन दरवर्षी एक कोटी टनांहून अधिक ई-कचरा निर्माण करतो, ज्यामध्ये मोबाईल, संगणक, टीव्ही आणि फ्रीजचा समावेश आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे : 1. मौल्यवान धातूंची कार्यक्षम वसुली होईल. 2. नैसर्गिक खाणकामावरील अवलंबित्व कमी होईल. 3. ‘ग्रीन मेटल रिकव्हरी’ उद्योगाला मोठी चालना मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT