बीजिंग : एकीकडे फॅक्टरीमधील मानवांचे काम रोबो हिरावून घेतील, अशी भीती लोकांना वाटत आहे, तर दुसरीकडे एका नवीन प्रयोगातून असे समोर आले आहे की, कधीकधी मशिन आणि रोबो स्वतःची नोकरी वाचवू शकत नाहीत आणि कामासाठी अयोग्य ठरतात. चीनची रोबो बनवणारी कंपनी 'एजीबॉट'ने (Agibot) नुकताच एक लाईव्हस्ट्रीम चॅलेंज आयोजित केला होता. यामध्ये त्यांच्या सहा ह्युमनॉईड (मानवासारखे दिसणारे) रोबोंचा समावेश होता.
या रोबोंना शांघायच्या शुहुई जिल्ह्यातील एका स्टोअरमध्ये २४ तासांच्या शिफ्टवर कामाला लावण्यात आले होते. 'रोबोट्स नेव्हर क्लॉक आऊट' नावाच्या या चॅलेंजचा उद्देश हे तपासणे हा होता की, हे ह्युमनॉईड रोबोट दिवस आणि रात्रीच्या वेगवेगळ्या वेळी रिटेल स्टोअरची दैनंदिन कामे सांभाळू शकतात की नाही. चला तर मग, या चॅलेंजचा निकाल जाणून घेऊया! चॅलेंजदरम्यान २४ तासांत सहा रोबोंनी मिळून एकूण १,७३० कामे पूर्ण केली. यामध्ये ६८३ वेळा ग्राहकांचे स्वागत करणे, ३६९ वेळा सामानाची देवाणघेवाण आणि १४७ वेळा कॉफी बनवण्याचा समावेश होता.
उर्वरित कामांमध्ये गरम अन्नाच्या ऑर्डर्स, शेल्फची तपासणी, सामान भरणे आणि टेबल साफ करणे यांसारख्या कामांचा समावेश होता. हे चॅलेंज दिवसाच्या चार वेगवेगळ्या वेळांच्या हिशेबाने डिझाईन केले गेले होते, ज्यामध्ये दुपारच्या जेवणाची गर्दी, संध्याकाळची गर्दी, रात्रीची वेळ आणि सकाळच्या नाश्त्याच्या वेळेची गर्दी यांचा समावेश होता. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये मशिन्स कशी कामगिरी करतात, हे पाहणे हा यामागचा उद्देश होता. चार रोबोंची कामगिरी तर ठीक राहिली; मात्र शेल्फ साफ करणे आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याच्या कामात गुंतलेले दोन रोबो अपयशी ठरले. 'आयटीहोम' च्या एका अहवालानुसार, साफसफाई करणाऱ्या रोबोला त्याच्या वाटेत कचऱ्याने भरलेला एक डबा सापडला.
तो कचरा बाजूला सारण्याऐवजी, तो रोबो आपल्या ठरलेल्या मार्गावरून भरकटला, स्टोअरच्या बाहेर निघून गेला आणि पुन्हा आपल्या जागेवर परत येऊ शकला नाही. दुसरीकडे, शेल्फची देखरेख करणाऱ्या रोबोमध्ये प्रॉडक्ट्सची तपासणी करण्याची आणि ते पुन्हा भरण्याच्या बाबतीत पुढाकार घेण्याची कमतरता दिसून आली आणि तो स्टोअरच्या कामाच्या वेगाशी जुळवून घेऊ शकला नाही. ह्युमनॉईड रोबो स्मार्ट असले, तरी त्यांना अजूनही मानवांची गरज भासते. कारण, एआय एजंट्स हार्डवेअरसोबत काम करण्याच्या बाबतीत अजूनही तितकेसे पटाईत नाहीत. गेल्या महिन्यात अमेरिकेच्या एका 'डायमेंशनल' नावाच्या स्टार्टअपनी सॅन फ्रान्सिस्कोच्या रस्त्यांवर आपल्या रोबो कुत्र्यांना फिरवण्यासाठी मानवांना नोकरीवर ठेवण्याची जाहिरात दिली होती.