विश्वसंचार

मस्क यांचा सामना करीत चीन सोडणार दहा हजार सॅटेलाईटस्

Arun Patil

बीजिंग : अंतराळात सॅटेलाईटस् म्हणजेच कृत्रिम उपग्रह सोडण्याबाबत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला, एक्स व स्पेसएक्ससारख्या कंपन्यांचे सर्वेसर्वा एलन मस्क यांचा जगभर दबदबा आहे. यावर्षी एप्रिलपर्यंत त्यांच्या 'स्टारलिंक' कंपनीने सुमारे 5,874 सॅटेलाईटस् लाँच केले आहेत. पृथ्वीच्या खालच्या स्तराच्या कक्षेत म्हणजेच लो अर्थ ऑर्बिटमध्ये 42 हजार सॅटेलाईटस्चे जाळे निर्माण करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा उद्देश जगातील अगदी दूरवरील, दुर्गम भागातील ठिकाणीही इंटरनेटची स्वस्त दरातील सेवा पोहोचावी, हा आहे. आता चीनने याबाबत मस्क यांच्याशी स्पर्धा सुरू केली आहे. एका चिनी कंपनीने अंतराळात दहा हजार सॅटेलाईटस्चा समूह लाँच करण्याची योजना बनवली आहे.

चीनमधील खासगी रॉकेट निर्माती कंपनी 'लँडस्पेस'शी निगडित 'शांघाय लांजियन होंगकिंग टेक्नालॉजी' ही कंपनी आपल्या 'होंगहू-3' समूहाबरोबर अंतराळात एलन मस्क यांच्याशी स्पर्धा करणार आहे. 'स्पेस न्यूज'च्या माहितीनुसार, कंपनीने आपल्या सॅटेलाईट समूहाला 160 ऑर्बिटल प्लॅनमध्ये स्थापन करण्यासाठी 24 मे रोजी आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाकडे सॅटेलाईट नेटवर्कसाठी अर्ज केला आहे. या चिनी कंपनीने दहा हजार सॅटेलाईटस् कक्षेत सोडण्यासाठी कोणती कालमर्यादा निश्चित केली आहे, याची माहिती नाही.

होंगहू योजना ही अशा प्रकारची तिसरी सर्वात मोठी योजना आहे. यापूर्वी अन्य दोन चिनी कंपन्यांनी असे प्रस्ताव सादर केले होते. त्यामध्ये एक राष्ट्रीय गुओवांग योजना आणि दुसरी शांघाय समर्थित 'जी60' स्टारलिंक योजना होती. शांघायमधील होंगकिंग टेक्नॉलॉजी कंपनी आपल्या हॉल थ्रस्टर प्रोपल्शन तंत्रज्ञानासाठी ओळखली जाते. सध्या ही कंपनी वुशी शहरात एक नवे सॅटेलाईट प्रॉडक्शन साईट बनवत आहे.

SCROLL FOR NEXT