Pudhari File Photo
विश्वसंचार

चीनमध्ये लेसर ड्रोननी मोजली झाडे, एकूण संख्या 142.6 अब्ज!

प्रत्येक नागरिकामागे सरासरी 100 झाडे

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : चीनमध्ये देशातील झाडांची एकूण संख्या मोजणे तसेच त्यांच्या देशभरातील क्षेत्राचा नकाशा बनवणे यासाठी लेसर ड्रोन आधारीत ‘लिडार’ या नव्या तंत्राचा वापर करण्यात आला. त्यानुसार चीनमध्ये एकूण 142.6 अब्ज झाडे आहेत, म्हणजेच प्रत्येक नागरिकामागे सरासरी 100 झाडे येतात.

चीनसारख्या अत्यंत घनदाट लोकसंख्येच्या देशासाठी हा मोठा आकडा आहे. तरीही, अभ्यासाच्या लेखकांच्या मते, झाडे मोजण्यासाठी वापरलेल्या तंत्रज्ञानाच्या मर्यादांमुळे हा आकडा कदाचित कमी असू शकतो. बीजिंग विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेंसिंग अँड जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम येथील प्राध्यापक आणि या अभ्यासाचे मुख्य लेखक किंगहुआ गुओ यांच्या मते, चीनमध्ये झाडांची वास्तविक संख्या अधिक असू शकते. 2019 मध्ये चीनच्या नवव्या राष्ट्रीय वनसंपत्ती सर्वेक्षणात देशभरात प्रति एकर सरासरी 426 झाडे (1,052 झाडे/हेक्टर) असल्याचे नोंदवले गेले होते; मात्र या नव्या अभ्यासानुसार हा आकडा केवळ 279 झाडे प्रति एकर (689 झाडे/हेक्टर) असल्याचे दिसून आले. त्यामुळे झाडांची खरी संख्या या दोन आकड्यांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे आणि अधिक संशोधनाची गरज आहे, असे गुओ यांनी स्पष्ट केले.

गुओ यांच्या मते, चीनमधील झाडांची अचूक संख्या ओळखणे महत्त्वाचे आहे, कारण यामुळे वन परिसंस्थेची स्थिती आणि कार्बन साठवण क्षमता मोजता येईल. संशोधकांनी चीनमधील झाडांच्या घनतेचा सविस्तर नकाशाही तयार केला आहे, जो देशाच्या पर्यावरण आणि हवामान धोरणांच्या उद्दिष्टांमध्ये मदत करेल. ‘हा अभ्यास चीनमधील झाडांच्या घनतेचे उच्च-रिझोल्युशन मॅपिंग करणारा पहिला प्रयोग आहे,’ असे गुओ यांनी सांगितले. ‘यामुळे चीनच्या जागतिक शाश्वत परिसंस्था व्यवस्थापन आणि पुनर्संचयित धोरणांसाठी मोलाची मदत होईल.’ संशोधकांनी झाडांची संख्या मोजण्यासाठी लिडार या लेसर-आधारित नकाशांकन तंत्रज्ञानाचा वापर केला. 2015 पासून, संशोधकांनी ड्रोनच्या मदतीने 540 चौरस मैल (1,400 चौरस किमी) क्षेत्राचे लिडार डेटासंग्रहण केले आहे. या अभ्यासासाठी, वैज्ञानिकांनी ‘लिडार 360’ नावाच्या एआय-आधारित सॉफ्टवेअरचा उपयोग करून या क्षेत्रातील झाडे मोजली आणि त्यानंतर संपूर्ण देशासाठी अंदाज काढला. या संशोधनाचे निष्कर्ष 6 फेब्रुवारी 2024 रोजी ‘सायन्स बुलेटिन’ जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT