China Humanoid Robot | हुबेहूब माणसासारखा दिसणारा चीनचा ‘सोबती’ रोबो 
विश्वसंचार

China Humanoid Robot | हुबेहूब माणसासारखा दिसणारा चीनचा ‘सोबती’ रोबो

स्पर्श करताच जाणवणार खरीखुरी त्वचा

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : एखादे मशिन तुमचे सुख-दुःख समजून घेऊ शकते का, असा विचार तुम्ही कधी केला आहे? चीनमधील ‘यूबीटेक’ (UBTech) या नामांकित रोबोटिक्स कंपनीने ही कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. कंपनीने एक असा अद्‌भुत ‘ह्युमनॉईड’ (माणसासारखा दिसणारा) रोबो लाँच केला आहे, जो कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी नाही, तर माणसांचा एकटेपणा दूर करण्यासाठी एका सोबतीच्या रूपात तयार करण्यात आला आहे. ‘यूवर्ल्ड यू१’ (UWORLD U1) असे या रोबोचे नाव असून, तो केवळ माणसासारखा दिसतोच असे नाही, तर माणसांच्या भावनादेखील समजून घेऊ शकतो. चीनमधील शेंझेन येथे ३० जून रोजी हा अनोखा रोबो जगासमोर सादर करण्यात आला. या रोबोचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यावर सिलिकॉनचा थर देण्यात आला आहे, ज्यामुळे त्याला स्पर्श केल्यास अगदी खऱ्याखुऱ्या माणसाच्या त्वचेसारखा भास होतो.

हा रोबो पुरुष आणि महिला अशा दोन वेगवेगळ्या व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. पुरुष रोबोची उंची १८३ सेंटीमीटर, तर महिला रोबोची उंची १६८ सेंटीमीटर आहे. याच्या शरीरात ८८ ‘सर्वो जॉईंटस्‌’ (सांधे) देण्यात आले आहेत, ज्यांच्या मदतीने हा रोबो माणसांप्रमाणे अत्यंत सहज आणि नैसर्गिकरीत्या हात-पाय हलवू शकतो. या रोबोला केवळ एक मशिन समजणे चुकीचे ठरेल. कारण, यामध्ये प्रगत ‘इमोशनल आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) प्रणाली बसवण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, UWORLD U1 माणसांच्या २० हून अधिक भावनिक छटा किंवा मूड ओळखू शकतो. जेव्हा तुम्ही याच्याशी बोलता, तेव्हा हा रोबो तुमच्या डोळ्यांत डोळे घालून संवाद साधतो. इतकेच नाही, तर यामध्ये भूतकाळातील गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमता आहे. त्यामुळे वेळेनुसार तो तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ लागतो आणि त्यानुसारच उत्तरे देतो.

हा शानदार रोबो सर्व वर्गांतील ग्राहकांसाठी लाईट, प्रो आणि अल्ट्रा अशा तीन वेगवेगळ्या व्हेरिएंटस्‌मध्ये उपलब्ध आहे. याची सुरुवातीची किंमत १,१९,८०० युआन (सुमारे १४ लाख रुपये) आहे, तर याच्या टॉप मॉडेलची किंमत ९,९०,००० युआन (सुमारे १.१५ कोटी रुपये) पर्यंत जाते. लोकांमध्ये या रोबोची क्रेझ इतकी आहे की, लाँचिंगच्या पहिल्याच दिवशी कंपनीला १३,३६१ युनिटस्‌च्या ऑर्डर मिळाल्या होत्या. अनेकदा एआय उपकरणांमुळे डेटा लीक होण्याचा धोका असतो. परंतु, या रोबोच्या बाबतीत असे होणार नाही. UWORLD U1 चे इमोशनल एआय मॉडेल पूर्णपणे ‘रॉकचिप’च्या (Rockchip) RK3588 प्रोसेसरवर स्थानिक (Local) पातळीवर काम करते. याचा अर्थ असा की, तुमचा संवाद आणि डेटा क्लाऊड सर्व्हरवर जात नाही, तर रोबोच्या आतच सुरक्षित राहतो. कंपनीने यात थ्री-लेयर प्रायव्हसी आर्किटेक्चर दिले आहे, ज्यामुळे युझरची गुप्तता पूर्णपणे सुरक्षित राहते आणि डेटा चोरीची कोणतीही भीती नसते.

रोबो बनले सोबती

UBTech चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स झोऊ यांच्या मते, रोबोटिक्सचे जग आता एका नवीन युगात पाऊल टाकत आहे. पूर्वी रोबो फक्त धोकादायक आणि थकवणारी कामे करायचे; पण आता ते आपले सोबती बनत आहेत. या रोबोचा वापर घरातील वृद्धांची काळजी घेण्यासाठी, मुलांच्या अभ्यासासाठी, हॉटेल्स, रिसेप्शन आणि प्रीमियम होम सर्व्हिसेसमध्ये उत्तम प्रकारे केला जाऊ शकतो. यामध्ये असे तंत्रज्ञान आहे की, कोणत्याही ‘वेक वर्ड’शिवाय (उदा. हॅलो किंवा अलेक्सा न म्हणता) तो तुमच्या आसपासची परिस्थिती पाहून स्वतःहून काम सुरू करू शकतो. हा रोबो सध्या केवळ प्रौढ खरेदीदारांसाठीच उपलब्ध आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT