बीजिंग : कोणत्याही घरात पाळीव कुत्रा किंवा मांजर हा केवळ एक प्राणी नसतो. त्याच्याशी कुटुंबातील सदस्यांच्या आठवणी जोडलेल्या असतात. तो घरातील सदस्यांसोबत खेळतो, त्यांच्या येण्याची वाट पाहतो आणि हळूहळू आयुष्याचा एक भाग बनून जातो. अशा वेळी जेव्हा त्याचा मृत्यू होतो, तेव्हा कुटुंबासाठी त्याला विसरणे सोपे नसते. चीनमध्ये काही लोक आपल्या पाळीव प्राण्यांच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी एक वेगळाच मार्ग स्वीकारत आहेत. लोक त्यांच्या केसांपासून किंवा अंत्यसंस्कारानंतर उरलेल्या राखेपासून हिरे तयार करून घेत आहेत. पुढे हा हिरा अंगठी किंवा पेंडेंटमध्ये बसवून ते स्वतःजवळ ठेवतात. चीनमधील हा व्यवसाय सध्या चांगलाच चर्चेत आहे. यामागचे कारण केवळ हिऱ्याच्या वाढत्या किमती नसून, त्यामागे दडलेल्या भावना आणि कंपन्यांच्या दाव्यांमधील सत्यता हेदेखील आहे. काही लोक आपल्या लाडक्या सोबत्याची आठवण जपण्याचा हा एक सुंदर मार्ग मानतात, तर काहींना असे वाटते की कंपन्या लोकांच्या दुःखाचा आणि भावनिक ओढीचा फायदा घेत आहेत.
'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'च्या अहवालानुसार, चीनच्या जिलिन प्रांतात राहणाऱ्या चेन शिंग यांची कहाणी हा व्यवसाय समजून घेण्यासाठी पुरेशी आहे. त्यांनी २०२० मध्ये आपल्या पाळीव कुत्र्याच्या, 'बाओबाओ'च्या, केसांपासून हिऱ्याची अंगठी बनवण्याची ऑर्डर दिली होती. त्या वेळी बाओबाओ म्हातारा होत चालला होता आणि चेन यांना त्याच्या आठवणी नेहमीच आपल्याजवळ ठेवायच्या होत्या. अहवालानुसार, फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांना ही अंगठी मिळाली. त्यामध्ये १८ कॅरेट सोन्याचा वापर करण्यात आला होता आणि मध्यभागी ०.५ कॅरेटचा हिरा बसवण्यात आला होता. ती बनवण्यासाठी त्यांनी ८,९५० युआन खर्च केले होते.
भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम सुमारे १.२ लाख रुपयांहून अधिक होती. एप्रिलमध्ये बाओबाओचा मृत्यू झाला. त्यानंतर चेन या अंगठीला रोज घालू लागल्या. ती घालून आपल्याला असे वाटते की आपला लाडका कुत्रा आजही आपल्या जवळच आहे, असे त्या सांगतात. पाळीव प्राण्यांच्या केसांमध्ये किंवा राखेमध्ये असलेला कार्बन वेगळा करून लॅबमध्ये (प्रयोगशाळेत) हिरा तयार केला जातो, असा दावा कंपन्या करतात. यासाठी सर्वप्रथम केस किंवा राख स्वच्छ करून त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर त्यातून कार्बन काढला जातो.
पुढे हा कार्बन हिरा तयार करण्याच्या प्रक्रियेत वापरला जातो. यासाठी काही कंपन्या 'हाय प्रेशर अँड हाय टेंपरेचर' अर्थात 'एचपीएचटी' (HPHT) तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचे सांगतात. यामध्ये कार्बनवर अत्यंत जास्त दाब आणि तापमान दिले जाते, ज्यामुळे त्याचे क्रिस्टलमध्ये रूपांतर होऊ शकते. तयार झालेला हिरा पुढे अंगठी, पेंडेंट किंवा इतर दागिन्यांमध्ये बसवता येतो. मात्र, कंपन्यांचे दावे आणि प्रत्यक्ष प्रक्रिया यामधील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. एखादा हिरा लॅबमध्ये तयार झाला आहे की नाही, हे तपासणीतून समजू शकते; पण त्यातील कार्बन हा एखाद्या विशिष्ट कुत्र्याचा किंवा मांजरीचाच आहे, हे सिद्ध करणे हे वेगळेच आव्हान आहे. चीनमध्ये अशा प्रकारची सेवा देणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढत आहे. 'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'च्या अहवालानुसार, तिथे किमान २० ब्रँड या व्यवसायात कार्यरत आहेत.