बीजिंग : अमेरिका, भारत, चीन, जपानसारख्या काही देशांनी महासंगणक बनवलेले आहेत. चीनचा एक महासंगणक पृथ्वीचे भवितव्य जाणून घेण्यासाठी बनवण्यात आलेला आहे. पृथ्वीचे भवितव्य काय असेल तसेच हवामान व जैविक प्रणालींमध्ये काय बदल होतील, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी चीनने मॅजिक क्यूब नावाचा दोन मजली महासंगणक तयार केलेला आहे. त्याचा खर्च 1.4 कोटी डॉलर्स इतका आहे. चीनच्या वैज्ञानिकांनी असे म्हटले आहे की, पृथ्वीवरील नैसर्गिक प्रणालीत होणारे बदल शोधले जाऊ शकतात किंवा त्याची नोंद करता येईल. अगदी ढगांच्या निर्मितीतील बदलांपासून सर्व बाबतीत आगामी काळात होणार्या बदलांचे भाकीत करता येतील.
अर्थ सिस्टीम न्युमरिकल सिम्युलेटर अँड सॉफ्टवेअरचे प्राथमिक रूप असलेल्या या महासंगणकाला सीएएस अर्थ सिस्टीम मॉडेल 1.0 असे नाव देण्यात आले आहे. त्याचे नाव ब्लू मॅजिक क्यूब असून, तो उत्तर बीजिंगमध्ये झोंगुआनकुन सॉफ्टवेअर पार्कमध्ये ठेवण्यात आला आहे. त्यात 9 कोटी युआन म्हणजे 1.4 कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. त्याची क्षमता 1 पेंटाफ्लॉप असून, तो चीनमधील दहा शक्तिमान महासंगणकांपैकी एक असणार आहे. त्याची साठवण क्षमता 5 पीबी आहे. आगामी प्रगत मॅजिक क्युबच्या एक दशांश आकाराचा हा महासंगणक आहे. सध्या त्याच्या मदतीने हवा प्रदूषण व हवामान अंदाज कमी काळाकरिता दिले जातील. चायनीज अॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग व चीनच्या हवामान प्रशासनाचे सदस्य डिंग यिहुई यांनी सांगितले की, चीनच्या पृथ्वी परिसंस्थांच्या साद़ृश्यीकरणासाठी ही योजना आहे. इन्स्टिट्यूट ऑफ अॅटमोस्फेरिक फिजिक्सचे संशोधक झांग मिंगहुआ यांनी सांगितले की, कॅस अर्थ सिस्टीम मॉडेल 1.0 मध्ये हवामान जैवसंस्था तसेच त्यांच्या अन्योन्यसंबंधाचा विचार केला आहे. अवकाशातील वैश्विक किरण व सौरवात यांचे साद़ृश्यीकरण त्यात आहे. आगामी तीस वर्षांतील हवामान बदल त्यात सांगता येतील तसेच हवा प्रदूषक कणांचा अंदाज 2.5 पीएम (पार्टिक्युलेट मॅटर) पर्यंत सांगता येईल. हरितगृह वायू व हवामान बदलात सुधारणा करण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे.