बीजिंग : चीनच्या ‘लूनार बेस’बाबत (चंद्र संशोधन केंद्र) काम करणाऱ्या संशोधकांनी तयार केलेल्या एका ब्लूप्रिंटनुसार, भविष्यात रोबो श्वान चंद्रावर मानवाला रस्ता दाखवण्याचे आणि तिथल्या रिसर्च स्टेशनची सुरक्षा करण्याचे काम करू शकतात. हे रोबो डॉग्स चंद्रावरील संभाव्य धोक्यांचा शोध घेण्यासोबतच अंतराळवीरांना अत्यंत मौल्यवान खडक आणि खनिजे शोधण्यात मदत करतील.
चीनची मुख्य अंतराळयान निर्मिती संस्था ‘चायना ॲकॅडमी ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी’च्या शास्त्रज्ञांनी जुलै महिन्यात ‘चायनीज स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ जर्नलमध्ये यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे. या ब्लूप्रिंटमध्ये तीन अंतराळवीर या स्मार्ट मशिन्ससोबत कसे काम करतील, याचे चित्र स्पष्ट केले आहे. जेव्हा अंतराळवीरांचे पथक चंद्राच्या पृष्ठभागावर संशोधन करेल, तेव्हा पहिला अंतराळवीर दोन रोबो कुत्र्यांना पुढे नेऊन त्या परिसराची पाहणी करेल. दुसरा अंतराळवीर खडकांचे नमुने गोळा करेल आणि सखोल वैज्ञानिक संशोधन करेल. तर तिसरा अंतराळवीर एका व्हॅनच्या आकाराच्या ‘प्रेशराईज्ड रोव्हर’च्या आत बसून संपूर्ण मिशनचे समन्वय साधेल आणि आवश्यकतेनुसार इतर रोबोंना नियंत्रित करेल.
वैज्ञानिक संशोधन अहवालानुसार, चीन मानवी अंतराळ मोहिमांचा विस्तार आता पृथ्वीच्या कक्षेच्या पलीकडे नेऊन चंद्रापर्यंत करत आहे. भविष्यातील चंद्रावरील मोहिमा या ‘निर्णय अंतराळवीरांचे आणि काम स्वयंचलित रोबोचे’ या तत्त्वावर चालतील. चंद्रावरील संसाधनांचा वापर करणे, गोठलेल्या बर्फापासून पाणी तयार करणे, खनिजांचे उत्खनन करणे, लावा ट्युब्सचे मानवी निवासात रूपांतर करणे आणि तेथील स्थानिक घटकांपासून बांधकामे करणे यांत हे रोबो अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतील.
याशिवाय, हे रोबो डॉग्स दररोजची गस्त घालणे, हवामान व तापमान नियंत्रित ठेवणे, राहण्याच्या जागांची स्वच्छता, वनस्पतींची काळजी घेणे आणि जेवण बनवणे यांसारखी दैनंदिन कामेही करतील. विशेष म्हणजे, एकांतवासामुळे अंतराळवीरांना येणारा मानसिक ताण कमी करण्यासाठी हे रोबो त्यांच्याशी संवाद साधून त्यांना सोबत देतील. ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तानुसार, चीन ‘इंटरनेशनल लूनर रिसर्च स्टेशन’ (ILRS) योजनेवर वेगाने काम करत आहे. रशिया आणि इतर आंतरराष्ट्रीय भागीदारांच्या मदतीने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हे दीर्घकालीन संशोधन केंद्र उभारले जात आहे.