Floating Windmill | चीन उभारणार समुद्रावर तरंगणारी महाकाय पवनचक्की Pudhari File Photo
विश्वसंचार

Floating Windmill | चीन उभारणार समुद्रावर तरंगणारी महाकाय पवनचक्की

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात चीनने एक मोठे यश मिळवले आहे. चिनी अभियंत्यांनी एका अशा तरंगत्या पवनचक्कीचा प्रोटोटाइप (नमुना) तयार केला आहे, ज्याने वीज निर्मितीचे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. या यशामुळे अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात एका नव्या युगाची सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही महाकाय पवनचक्की चीनची सरकारी ऊर्जा कंपनी ‘चायना हुआनेंग ग्रुप’ आणि ‘डोंगफांग इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन’ यांच्या संयुक्त संशोधनाचे फळ आहे. या दोन्ही कंपन्यांनी मिळून भविष्यातील ऊर्जेची गरज भागवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

पवनचक्कीची क्षमता आणि भव्यता

या पवनचक्कीची रचना आणि क्षमता थक्क करणारी आहे. यातील प्रत्येक पवनचक्की तब्बल 17 मेगावॅट (MW) स्वच्छ वीज निर्माण करण्यास सक्षम असेल. वार्षिक वीज निर्मिती : वर्षाला सुमारे 68 दशलक्ष किलोवॅट-तास (kWh) वीज. अमेरिकेच्या ऊर्जा प्रशासन डेटानुसार, ही वीज एका वर्षात सुमारे 6,300 घरांना ऊर्जा पुरवण्यासाठी पुरेशी आहे. उंची आणि आकार : या पवनचक्कीचा मनोरा 152 मीटर (489 फूट) उंच आहे. त्यावर बसवलेल्या पातींचा व्यास 262 मीटर (860 फूट) इतका प्रचंड आहे. पात्यांची ताकद : पातींचा एक 360-अंशाचा फेरा तब्बल 53,000 चौरस मीटरचे क्षेत्र व्यापतो, जे जवळपास आठ फुटबॉलच्या मैदानांएवढे आहे. एकाच पवनचक्कीतून जास्त वीज निर्माण करणे हे पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे कमी जागेत कमी पवनचक्की बसवून जास्त ऊर्जा मिळवता येते, ज्यामुळे प्रकल्पाचा खर्च कमी होतो आणि तो लवकर कार्यान्वित होतो.

आव्हान पेलण्याची क्षमता : समुद्रात खोलवर उभारलेल्या पवनचक्कींना तीव्र वादळे आणि प्रचंड लाटांचा सामना करावा लागतो. निर्मात्यांच्या मते, ही पवनचक्की अशा आव्हानांसाठी पूर्णपणे सज्ज आहे.

‘चायना हुआनेंग ग्रुप’ने दिलेल्या माहितीनुसार, ही पवनचक्की 24 मीटर (78 फूट) पेक्षा उंच लाटा आणि चक्रीवादळाच्या वेगाने (73 मैल प्रति तास पेक्षा जास्त) वाहणारे वारे सहज सहन करू शकते. येत्या काही महिन्यांत चीनच्या यांगजियांग किनार्‍याजवळ या पवनचक्कीची प्रत्यक्ष समुद्रात चाचणी केली जाईल.

तरंगती विरुद्ध स्थिर पवनचक्की : काय आहे फरक?

सध्या समुद्रातील बहुतेक पवनचक्की ‘फिक्स्ड बॉटम’ प्रकारच्या आहेत, म्हणजेच त्या समुद्राच्या तळाशी घट्ट बसवलेल्या असतात. उथळ समुद्रात (उदा. उत्तर समुद्रात, ज्याची सरासरी खोली फक्त 295 फूट आहे) हे तंत्रज्ञान किफायतशीर ठरते. मात्र, तरंगत्या पवनचक्की खोल समुद्रात उभारता येतात, जिथे वारे अधिक तीव्र आणि सातत्यपूर्ण असतात. यामुळे कमी वेळेत जास्त ऊर्जा निर्माण करणे शक्य होते. जरी तरंगते पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सुरुवातीला जास्त खर्च येत असला, तरी दीर्घकाळात मिळणारी प्रचंड ऊर्जा हा खर्च भरून काढते. या क्षेत्रात चीनची ही 17 मेगावॅटची तरंगती पवनचक्की एक मैलाचा दगड आहे. तुलनेसाठी, ब्रिटनच्या डॉगर बँक विंड फार्ममध्ये वापरल्या जाणार्‍या पवनचक्की 13 मेगावॅट क्षमतेच्या आहेत, तर अमेरिकेच्या साऊथ फोर्क विंड फार्ममधील पवनचक्की 11 मेगावॅट वीज निर्माण करतात. या पार्श्वभूमीवर चीनचे हे यश अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राला नवी दिशा देणारे ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT