बीजिंग: ज्याप्रमाणे भारतामध्ये नागरिकांना अधिकृत ओळख म्हणून ‘आधार’सारखे ओळखपत्र दिले जाते, अगदी त्याच धर्तीवर आता चीनमध्ये रोबोंनाही अधिकृत ओळख मिळणार आहे. चीनच्या हुबेई प्रांतात काही रोबोंना स्वतःचा अधिकृत युनिक आयडी कार्ड नंबर दिला जाणार आहे. युनिक एआय कार्ड नंबर मिळवणारे हे देशातील पहिले रोबो ठरणार आहेत. माणसांप्रमाणेच रोबोंच्याही संपूर्ण जीवनकाळातील क्रियाकलापांवर लक्ष ठेवता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
ऑनलाईन मीडिया रिपोर्टस्नुसार, रोबोंना दिला जाणारा हा युनिक आयडी कार्ड नंबर 29 अक्षरांचा असेल. या कोडमध्ये रोबोच्या ब—ँडची राष्ट्रीयता, उत्पादक कंपनी, प्रॉडक्ट मॉडेल, सिरियल नंबर, हार्डवेअर स्पेसिफिकेशन्स, इंटेलिजन्स लेव्हल (बुद्धिमत्ता पातळी) आणि फॅक्टरी रेकॉर्ड यांसारखी सर्व महत्त्वाची माहिती समाविष्ट असेल. चीनमधील ‘ह्युमनॉइड रोबोटिक्स’ (मानवासारखे दिसणारे रोबो) उद्योगाचा वेगाने होणारा विस्तार लक्षात घेता, या रोबोंच्या कामावर देखरेख ठेवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. हा प्रकल्प वुहान येथील ‘हुबेई ह्युमनॉइड रोबो इनोव्हेशन सेंटर’च्या नेतृत्वाखाली राबवला जात आहे.
चीनमध्ये कारखाने आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये ह्युमनॉइड रोबोंचा वापर सातत्याने वाढवला जात आहे. ‘चायना डेली’च्या वृत्तानुसार, हा डिजिटल आयडी प्लॅटफॉर्म रोबोंच्या आयुष्यातील देखभालीचा इतिहास (चरळपींशपरपलश कळीीेीूं) आणि त्याच्या कामगिरीची नोंद गोळा व ट्रॅक करू शकतो. इनोव्हेशन सेंटरच्या माहितीनुसार, या खास ओळख क्रमांकाच्या मदतीने एकाच ठिकाणी बसून रोबोचे कोणते सुटे भाग किती झिजले आहेत, त्याची बॅटरी कशी आहे आणि तो किती अचूकतेने काम करत आहे, हे पाहता येईल.
तांत्रिक बिघाड झाल्यास काय करावे हे ठरवण्यासाठी आणि रोबोची काळजी घेण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल, असे अधिकार्यांनी सांगितले. रोबोटिक्स क्षेत्रात वेगाने प्रगती होत असली, तरी सुरक्षा देखरेख आणि डेटाच्या देवाणघेवाणीसाठी एका समान चौकटीचा अभाव या उद्योगासमोर होता. ही नवीन यंत्रणा या उणिवा दूर करेल आणि मोठ्या प्रमाणावर उच्च दर्जाच्या विकासाला चालना देईल. तसेच, तांत्रिक बिघाड किंवा डेटाशी संबंधित धोक्यांच्या वेळी त्वरित पावले उचलण्यास यामुळे मदत होईल.
ह्युमनॉइड रोबो मार्केटमध्ये चीनचा दबदबा
उद्योग क्षेत्रातील आकडेवारीनुसार, 2025 मध्ये जगभरात सुमारे 17,000 ह्युमनॉइड रोबोटस्ची शिपमेंट (वितरण) झाली. यामध्ये चीनचा वाटा सर्वाधिक आहे. चीनमध्ये 140 हून अधिक रोबो उत्पादक कंपन्या असून तिथून जवळपास 14,400 रोबो वितरित करण्यात आले, जे जगभरातील एकूण उत्पादनाच्या तब्बल 84.7 टक्के आहे.