बीजिंग : चीन पृथ्वीवर ‘कृत्रिम सूर्य’ (आर्टिफिशियल सन) तयार करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे गेला आहे. अणू संकलन किंवा ‘न्यूक्लियर फ्युजन’च्या माध्यमातून स्वच्छ आणि अमर्याद ऊर्जा निर्माण करण्यासाठी चीनने जगातल्या सर्वात मोठ्या ‘सुपरकंडक्टिंग फ्युजन मॅग्नेट’ची यशस्वी चाचणी घेतली आहे.
२०३० पर्यंत फ्युजन पॉवरद्वारे वीजनिर्मिती करण्याच्या चीनच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या यशामुळे चीन आता कार्बन-मुक्त ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत विकसित करणाऱ्या आघाडीच्या देशांमध्ये समाविष्ट झाला आहे. हा सुपरकंडक्टिंग मॅग्नेट ‘चायनीज ॲकॅडमी ऑफ सायन्सेस’अंतर्गत असलेल्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ प्लाझ्मा फिजिक्स’ने विकसित केला आहे. हा सुपरकंडक्टिंग मॅग्नेट म्हणजे 'D' आकाराची एक प्रचंड मोठी संरचना असून, ती २१ मीटर लांब आणि १२ मीटर रुंद आहे. या अवाढव्य चुंबकीय संरचनेचे वजन तब्बल ५८२ टन आहे.
‘कृत्रिम सूर्य’ हा एक न्यूक्लियर फ्युजन अणुभट्टी (रिएक्टर) प्रकल्प आहे, जो प्रत्यक्षात सूर्यामध्ये ऊर्जा निर्माण होणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियेची पुनरावृत्ती करतो. ही यंत्रणा १० कोटी अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानावर हायड्रोजनच्या अणूंना एकत्र जोडते (फ्युजन). या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईडचा कोणताही विषारी वायू तयार न होता प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. भविष्यात ही तंत्रज्ञान प्रणाली जगभरासाठी अमर्याद आणि स्वच्छ ऊर्जेचा मुख्य स्त्रोत ठरेल, असा वैज्ञानिकांचा विश्वास आहे. या विशाल मॅग्नेटसोबतच चिनी संशोधकांनी ‘हाय-टेंपरेचर सुपरकंडक्टिंग सेंट्रल सोलेनॉईड कॉईल’चीही यशस्वी चाचणी केली आहे. या भागाला फ्युजन रिएक्टरचे ‘हृदय’ म्हटले जाते. वाहनांच्या इंजिनमध्ये ‘स्पार्क प्लग’ जे काम करतो, तसेच काम हे सोलेनॉईड कॉईल करते. ते अणू संकलनाच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या प्लाझ्माला सुरू करण्यास आणि ते स्थिर ठेवण्यास मदत करते.
संशोधकांच्या मते, हा आतापर्यंतचा जगातील सर्वात मोठा सुपरकंडक्टिंग फ्युजन मॅग्नेट आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ITER' (International Thermonuclear Experimental Reactor) या जगातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या फ्युजन प्रकल्पातील मॅग्नेटपेक्षा हा १.३ पट मोठा आहे. यामध्ये साठवली जाणारी ऊर्जा ITER च्या मॅग्नेटपेक्षा तीन पटीने जास्त आहे. हा मॅग्नेट अत्यंत शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र निर्माण करतो. हे चुंबकीय क्षेत्र १० कोटी अंश सेल्सिअसपर्यंत तापलेल्या अतिउष्ण ‘प्लाझ्मा’ वायूला अणुभट्टीच्या आतल्या आत रोखून ठेवते आणि त्याला भट्टीच्या भिंतींना स्पर्श करूदेत नाही.