Solid state battery | चीनमध्ये 1,000 कि.मी. रेंजच्या ‘सॉलिड-स्टेट’ बॅटरीची यशस्वी चाचणी xia yuan
विश्वसंचार

Solid state battery | चीनमध्ये 1,000 कि.मी. रेंजच्या ‘सॉलिड-स्टेट’ बॅटरीची यशस्वी चाचणी

ईव्ही क्षेत्रांत मोठी क्रांती

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) जगात मैलाचा दगड ठरेल, असा शोध चीनमधील संशोधकांनी लावला आहे. तियानजिनमधील नानकाई विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एका नवीन पिढीच्या ‘सॉलिड-स्टेट’ बॅटरीची यशस्वी चाचणी केली असून, ही बॅटरी एका चार्जवर 1,000 किलोमीटरपेक्षा (620 मैल) जास्त अंतर कापण्यास सक्षम आहे. भविष्यातील आवृत्त्यांमध्ये ही रेंज आणखी वाढण्याची शक्यता आहे.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हाय-एनर्जी बॅटरी सिस्टीम एका प्रत्यक्ष वाहनामध्ये बसवून त्याची लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी चाचणीदेखील घेण्यात आली आहे. या बॅटरीची ऊर्जा घनता 500 वॅट-तास प्रतिकिलोग्रॅम पेक्षा जास्त आहे. सध्याच्या लिथियम-आयन बॅटरीच्या तुलनेत ही 30 टक्के जास्त आहे. बॅटरीची घनता जास्त असल्यामुळे कमी वजनात आणि लहान आकारात जास्त ऊर्जा साठवता येते, ज्यामुळे गाडीची रेंज वाढते.

सध्याच्या लिथियम-आयन बॅटरीजमध्ये ‘लिक्विड इलेक्ट्रोलाईट’ असते जे ज्वलनशील असते. मात्र, ‘सॉलिड-स्टेट’ बॅटरीमध्ये घन इलेक्ट्रोलाईट वापरले जाते, जे आग पकडत नाही आणि अपघाताचा धोका कमी करते. या बॅटरीमध्ये शॉर्टसर्किटला कारणीभूत ठरणारे ‘डेंड्राईटस्’ (धातूचे अणकुचीदार कण) तयार होण्याचे प्रमाण कमी असल्याने बॅटरी जास्त काळ टिकते. ही बॅटरी ‘लिथियम-रिच मँगनीज कॅथोड’ आणि ‘हाइब्रिड सॉलिड-लिक्विड इलेक्ट्रोलाईट’ प्रणालीवर आधारित आहे. सध्याच्या संपूर्ण बॅटरी पॅकची क्षमता 142 kWh आहे.

शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, भविष्यातील मॉडेल्समध्ये ही क्षमता 200 kWh पर्यंत नेली जाईल, ज्यामुळे गाड्या एका चार्जवर चक्क 1,600 कि.मी. (1,000 मैल) धावू शकतील. 2024 मधील आकडेवारीनुसार, बहुतेक इलेक्ट्रिक गाड्यांची सरासरी रेंज 455 किमी आहे, तर ‘ल्युसिड एअर’ सारख्या महागड्या गाड्या 825 किमीपर्यंत रेंज देतात. चिनी संशोधकांचा हा दावा खरा ठरल्यास, ईव्ही उद्योगाचे चित्र पूर्णपणे बदलू शकते. या बॅटरीची निर्मिती चीनमधील ‘Faw Group’ च्या उपकंपनीने (CANEB) एका प्रोटोटाईप कारसाठी केली आहे. या वर्षाच्या अखेरीस याचे सार्वजनिक प्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT