बीजिंग : भविष्यातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पाहिल्या जाणार्या ‘एअर टॅक्सी’ क्षेत्रात चीनने मोठी बाजी मारली आहे. एका चिनी कंपनीने तब्बल 10 प्रवाशांना वाहून नेण्याची क्षमता असलेल्या 5 टनी इलेक्ट्रिक विमानाची (eVTOL) यशस्वी चाचणी पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या वजनाच्या इलेक्ट्रिक विमानाचे हे जगातील पहिलेच यशस्वी उड्डाण ठरले आहे.
‘फेनफेई एव्हिएशन’ या कंपनीने विकसित केलेले हे विमान विना-धावपट्टी, म्हणजेच हेलिकॉप्टरप्रमाणे कोठूनही उडू आणि उतरू शकते. या विमानाचे नाव V5000 ‘स्काय ड्रॅगन’ असे आहे. यामधून एकावेळी 10 प्रवासी प्रवास करू शकतात. पूर्णपणे इलेक्ट्रिक मॉडेल 250 कि.मी., तर हायब—ीड मॉडेल 1,500 कि.मी.पर्यंत प्रवास करू शकते. फेनफेईच्या या ‘स्काय ड्रॅगन’मुळे आता शहरांमधील प्रवासासोबतच एका शहरातून दुसर्या शहरात मोठ्या गटाने विमान प्रवास करणे स्वस्त आणि सुलभ होणार आहे.
जिआंगसू प्रांतात झालेल्या या चाचणीवेळी विमानाने हवेत झेप घेतल्यानंतर काही काळ स्थिर उड्डाण केले आणि पुन्हा सुरक्षित लँडिंग केले. विमानाची रचना 20 मीटर रुंद पंखांवर आधारित असून, यात तब्बल 20 ‘लिफ्ट मोटर्स’ बसवण्यात आल्या आहेत. तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी ही विशेष खबरदारी घेण्यात आली आहे; जर प्रवासादरम्यान काही मोटर्स बंद पडल्या, तरी उर्वरित मोटर्सच्या साहाय्याने विमान सुरक्षितपणे उतरू शकेल.
सध्या जगभरात ‘जोबी एव्हिएशन’ आणि ‘इहँग’सारख्या कंपन्या एअर टॅक्सी व्यवसायात उतरल्या आहेत. मात्र, त्या प्रामुख्याने 4 ते 6 प्रवाशांसाठी आणि कमी अंतरासाठी डिझाईन केलेल्या आहेत. याउलट, फेनफेईचे ‘V5000’ विमान प्रादेशिक वाहतुकीसाठी गेमचेंजर ठरू शकते. या प्रकल्पाला जगातील आघाडीची बॅटरी निर्माता कंपनी CATL कडून कोट्यवधी डॉलरची गुंतवणूक मिळाली आहे, ज्यामुळे या विमानाचे व्यावसायिक उत्पादन लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.