China Space Station | चीनच्या अंतराळ स्थानकात अणूंचे तापमान नीचांकी करण्यात यश 
विश्वसंचार

China Space Station | चीनच्या अंतराळ स्थानकात अणूंचे तापमान नीचांकी करण्यात यश

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : चीनच्या ‘तियांगोंग’ अंतराळ स्थानकातील एका विक्रमी प्रयोगात वैज्ञानिकांनी अणूंना आतापर्यंतच्या सर्वाधिक नीचांकी तापमानाला थंड करण्यात यश मिळवले आहे. लेसर ट्रॅपचा वापर करून अणूंचे तापमान भौतिकशास्त्रानुसार शक्य असलेल्या ‘निरपेक्ष शून्या’च्या अगदी जवळ नेण्यात आले आहे.

५ नोव्हेंबर रोजी प्रतिष्ठित ‘सायन्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, या प्रयोगात वैज्ञानिकांनी अणूंचे तापमान तब्बल १० पिकोकेल्व्हिन इतके खाली आणले. निरपेक्ष शून्य हे भौतिकशास्त्राच्या नियमांनुसार शक्य असलेले सर्वात कमी सैद्धांतिक तापमान मानले जाते. हे तापमान वजा ४५९.६७ अंश फॅरेनहाईट (वजा २७३.१५ अंश सेल्सिअस) इतके असते. या तापमानावर पोहोचल्यावर कोणत्याही वस्तूतील सर्व कण आपली हालचाल पूर्णपणे थांबवतात, असा वैज्ञानिक अंदाज आहे. वैज्ञानिकांनी हे यश मिळवण्यासाठी ‘ऑप्टिकल ट्वेझर्स’चा वापर केला, ज्यांना तांत्रिक भाषेत ‘ऑप्टिकल-डायपोल ट्रॅप’ म्हटले जाते. या उपकरणाच्या साहाय्याने लेसर बीममध्ये अणूंना जखडून ठेवले जाते. या प्रयोगात संशोधकांनी रुबिडियमचे २०,००० अणू या ट्रॅपमध्ये ठेवून त्यांची हालचाल अत्यंत मर्यादित केली.

अंतराळ स्थानकातील गुरुत्वाकर्षणरहित (भारहीन) वातावरण आणि कमी झालेली कणांची हालचाल या दोन्हींच्या संयोगामुळे अणूंचा हा समूह पृथ्वीवर शक्य असलेल्या तापमानापेक्षाही कैक पटीने अधिक थंड झाला. या प्रयोगाचे यश भविष्यातील अंतराळ संशोधनासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. याविषयी बोलताना संशोधकांनी शोधनिबंधात म्हटले आहे की, ‘हे विक्रमी नीचांकी तापमान अंतराळातील क्वांटम सिम्युलेशन आणि अचूक मोजमापांच्या क्षेत्रातील नवीन प्रयोगांना मोठी चालना देईल.’ जरी हे मोठे यश मिळाले असले, तरी वैज्ञानिकांना कधी प्रत्यक्ष ‘निरपेक्ष शून्य’ तापमान गाठता येईल का, याबाबत शंकाच आहे. उष्णतागतिकीच्या तिसऱ्या नियमानुसार, प्रणाली जेव्हा निरपेक्ष शून्याच्या जवळ जातात, तेव्हा कणांमध्ये नेहमीच काही प्रमाणात एन्ट्रॉपी (अव्यवस्था) शिल्लक राहते. त्यामुळे निरपेक्ष शून्य तापमान गाठणे तात्त्विकदृष्ट्या अशक्य मानले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT