बीजिंग : चीनच्या एका अत्यंत गोपनीय आणि रहस्यमय 'स्पेस प्लेन'ने (अंतराळ विमान) पृथ्वीच्या कक्षेत पुन्हा एकदा एक अज्ञात वस्तू सोडली आहे. यामुळे हे गूढ अंतराळ विमान नेमके अवकाशात काय करत आहे, याबद्दल जगभरात मोठी चिंता आणि उत्सुकता निर्माण झाली आहे. २०१२ पासून या गुप्त अंतराळ विमानाने आपल्या ग्रहाभोवती किमान ९ अज्ञात वस्तू (पेलोडस्) तैनात केल्या आहेत, परंतु त्या नेमक्या काय आहेत, याची अद्याप कोणालाही माहिती नाही.
'शेनलॉन्ग' किंवा 'डिव्हाईन ड्रॅगन' नावाचे हे स्पेस प्लेन एक पुन्हा वापरता येणारे आणि रोबोटिक अंतराळ विमान आहे. चीन उभ्या रॉकेटच्या साहाय्याने या विमानाला वारंवार पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (पृथ्वीपासून जवळच्या अंतरावरील कक्षेत) पाठवतो. तिथे आपले मिशन पूर्ण केल्यानंतर हे विमान एखाद्या सामान्य विमानासारखे धावपट्टीवर आडवे लँडिंग करते. ही कार्यपद्धती नासाच्या आता बंद झालेल्या प्रसिद्ध 'स्पेस शटल' प्रोग्रामसारखीच आहे. विशेष म्हणजे, चीनबाहेरील इतर कोणत्याही देशाने किंवा संस्थेने या स्पेस प्लेनचे छायाचित्र अद्याप काढलेले नाही. त्यामुळे हे विमान नेमके कसे दिसते किंवा त्याचा आकार किती मोठा आहे, याची कोणतीही स्पष्ट कल्पना जगाला नाही.
चीनच्या अंतराळ क्षेत्रातील अधिकार्यांनीही या विमानाचे डिझाईन किंवा त्याच्या उद्देशाबाबत कोणतीही महत्त्वाची माहिती जाहीर केलेली नाही. या स्पेस प्लेनची चौथी आणि सध्या सुरू असलेली मोहीम यावर्षी ७ फेब्रुवारी रोजी सुरू झाली. गोबी वाळवंटातील चीनच्या 'जियुक्वान सॅटेलाईट लॉन्च सेंटर'वरून 'लॉन्ग मार्च २एफ' रॉकेटद्वारे याचे प्रक्षेपण करण्यात आले होते. तेव्हापासून त्याच्या हालचालींबद्दल कोणतीही बातमी नव्हती. परंतु, २२ जून रोजी पृथ्वीच्या खालच्या कक्षेतील उपग्रहांवर नजर ठेवणाऱ्या 'लिओलॅब्स' या खासगी अंतराळ निरीक्षण संस्थेने या स्पेस प्लेनजवळ एक अज्ञात वस्तू शोधून काढली. न्यूझीलंडमधील कंपनीच्या रडारने ही गूढ वस्तू पहिल्यांदा टिपली, जी त्यांच्याकडे असलेल्या इतर कोणत्याही उपग्रह किंवा वस्तूंच्या नोंदीशी जुळत नव्हती.
पहिली मोहीम (सप्टेंबर २०२०).
हे विमान अवकाशात पहिल्यांदा फक्त दोन दिवसांच्या मोहिमेवर गेले होते.
दुसरी मोहीम (ऑगस्ट २०२२ ते मे २०२३).
या मोहिमेदरम्यान विमानाने ८ महिने अवकाशात घालवले आणि पहिल्यांदा एक अज्ञात वस्तू अवकाशात सोडली.
तिसरी मोहीम (डिसेंबर २०२३ ते सप्टेंबर २०२४).
९ महिन्यांच्या या मोहिमेदरम्यान विमानाने आणखी ७ वस्तू अवकाशात तैनात केल्या, ज्यातील ६ वस्तू एकाच वेळी बाहेर सोडण्यात आल्या होत्या.