China space experiment | चीनने अंतराळात पाठवले ‘कृत्रिम भ्रूण’ 
विश्वसंचार

China space experiment | चीनने अंतराळात पाठवले ‘कृत्रिम भ्रूण’

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : भविष्यात मानव अंतराळात मुले जन्माला घालू शकेल का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी चीनने एक अत्यंत धाडसी आणि महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. चीनने सोमवारी ‘तिआनझोऊ-10’ हे कार्गो स्पेसक्राफ्ट यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले. या मोहिमेने केवळ अंतराळ स्थानकासाठी रसदच नेली नाही, तर त्यासोबत एक अत्यंत खास वैज्ञानिक प्रयोगही पाठवला आहे. या मोहिमेत पहिल्यांदाच अंतराळात ‘आर्टिफिशियल एम्ब्रियो’ म्हणजेच कृत्रिम भ्रूणाच्या विकासाचा अभ्यास केला जाणार आहे.

शून्य गुरुत्वाकर्षण (माइक्रोग्रॅव्हिटी) आणि कॉस्मिक रेडिएशनचा मानवी जीवनाच्या सुरुवातीच्या प्रक्रियेवर काय परिणाम होतो, हे शास्त्रज्ञांना जाणून घ्यायचे आहे. चिनी अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या माहितीनुसार, या मोहिमेत एकूण 67 वैज्ञानिक उपकरणे आणि साहित्य पाठवण्यात आले आहे, ज्याचे वजन 768 किलोपेक्षा जास्त आहे. यांचा वापर 41 वेगवेगळ्या प्रयोगांसाठी केला जाईल; परंतु सर्वात जास्त चर्चा ‘आर्टिफिशियल एम्ब्रियो’ची होत आहे. प्रकल्प व्यवस्थापक यू लेकियान यांनी स्पष्ट केले की, मानवी भ्रूण मोठ्या प्रमाणावर संशोधनासाठी सहज उपलब्ध नसतात. त्यामुळे शास्त्रज्ञांनी ‘स्टेम सेल्स’च्या मदतीने अशी रचना तयार केली आहे, जी हुबेहूब मानवी भू्रणासारखी दिसते आणि तशीच प्रक्रिया करते. यालाच ‘आर्टिफिशियल एम्ब्रियो’ म्हणतात. हे खरे मानवी भ्रूण नसून त्यांच्यापासून पूर्ण मानवाची निर्मिती होऊ शकत नाही; मात्र मानवी विकासाचा सुरुवातीचा टप्पा समजून घेण्यासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरतात.

गर्भधारणेनंतरच्या 14 ते 21 दिवसांमधील महत्त्वाचा काळ समजून घेण्यासाठी हा प्रयोग केला जात आहे. याच काळात शरीराच्या कोणत्या भागापासून डोके तयार होणार आणि कोणत्या भागापासून खालचा भाग, हे निश्चित होत असते. पृथ्वीवर जीवनाचा विकास अब्जावधी वर्षांपासून गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली झाला आहे. मात्र, अंतराळात जिथे गुरुत्वाकर्षण शून्य असते, तिथे सस्तन प्राण्यांचा विकास कसा होईल, हे अद्याप स्पष्ट नाही. अंतराळ स्थानकातील नैसर्गिक कॉस्मिक रेडिएशन आणि माइक्रोग्रॅव्हिटीचे वातावरण पृथ्वीवर तयार करणे अशक्य आहे, म्हणूनच हे नमुने अवकाशात पाठवण्यात आले आहेत.

पुढील प्रक्रिया कशी असेल?

पाच दिवसांचा विकास : अंतराळ स्थानकात हे कृत्रिम भू्रण पाच दिवसांपर्यंत विकसित केले जातील.

देखरेख : अंतराळवीर या प्रक्रियेवर लक्ष ठेवतील. तेथील स्वयंचलित यंत्रणा दररोज पोषक द्रावण (Nutrient Solution) बदलतील.

पृथ्वीवर परत : प्रयोग पूर्ण झाल्यानंतर हे नमुने गोठवून (Freeze) पुन्हा पृथ्वीवर आणले जातील आणि लॅबमध्ये त्यांचे सखोल विश्लेषण केले जाईल.

भविष्यातील मानवी वसाहतीचे स्वप्न :

जर मानवाला भविष्यात चंद्र किंवा मंगळावर वस्ती करायची असेल, तर सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की, मानवी पिढ्या तिथे तग धरू शकतील का? अवकाशात प्रजनन शक्य आहे का? या मोहिमेतून मिळणारी माहिती या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यास मदत करेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT