Hexagonal Diamond | चीनच्या शास्त्रज्ञांनी बनवला जगातील सर्वात कठीण ‘हेक्झागोनल’ हिरा! 
विश्वसंचार

Hexagonal Diamond | चीनच्या शास्त्रज्ञांनी बनवला जगातील सर्वात कठीण ‘हेक्झागोनल’ हिरा!

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : हिरा हा पृथ्वीवरील सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ मानला जातो; परंतु आता त्यालाही मागे टाकणारा एक दुर्मीळ प्रकार चीनच्या संशोधकांनी प्रयोगशाळेत तयार केला आहे. ‘नेचर’ या प्रसिद्ध वैज्ञानिक मासिकात 4 मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधानुसार, संशोधकांनी प्रथमच ‘शुद्ध ‘हेक्झागोनल डायमंड’ चे नमुने तयार करण्यात यश मिळवले आहे.

नैसर्गिक हिरा, ज्याला ‘क्यूबिक डायमंड’ म्हटले जाते, त्यातील कार्बन अणूंची रचना चौकोनी (Cubic) असते. याउलट, ‘हेक्झागोनल’ हिर्‍यामध्ये कार्बन अणूंची मांडणी मधाच्या पोळ्याप्रमाणे षटकोनी (Hexagonal) असते. याला ‘लोन्सडेलाईट’ (Lonsdaleite) असेही म्हणतात. हा पदार्थ अवकाशातून पडणार्‍या उल्कांमध्ये अतिशय सूक्ष्म प्रमाणात आढळतो. 1962 मध्ये पहिल्यांदा अशा हिर्‍याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

1967 मध्ये प्रयोगशाळेत याचे काही अंश दिसले; परंतु ते शुद्ध स्वरूपात नव्हते. हे हिरे प्रामुख्याने ‘युरिलाइट’ (Ureilite) नावाच्या उल्कांमध्ये आढळतात, ज्यांचा उगम नष्ट झालेल्या बटू ग्रहांच्या गाभ्यातून होतो. भारताच्या आसाममधील ‘गोलपारा’ येथे सापडलेल्या उल्केतही याचे अंश आढळले होते. आतापर्यंत या हिर्‍याचे मोजमाप करणे अशक्य होते. कारण, तो इतर खनिजांसोबत मिश्रित असायचा. मात्र, चिनी संशोधकांनी 1.5 मिलिमीटर व्यासाचे शुद्ध नमुने तयार केले आहेत, जे चाचणीसाठी पुरेसे मोठे आहेत.

संशोधनात असे दिसून आले आहे की, हा ‘हेक्झागोनल’ हिरा सामान्य हिर्‍यापेक्षा जास्त कठीण (Harder) आणि ताठर (Stiffer) आहे. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची ‘ऑक्सिडेशन’ला प्रतिकार करण्याची क्षमता. ‘हा हिरा सामान्य हिर्‍याच्या तुलनेत खूप जास्त तापमान सहन करू शकतो. ऑक्सिजनसोबत याची प्रक्रिया लवकर होत नसल्यामुळे ड्रिलिंग (खडक फोडणे) सारख्या कामांमध्ये याचा वापर अत्यंत प्रभावी ठरू शकतो,’ असे संशोधकांनी नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT