शांघाय : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आता केवळ तंत्रज्ञानापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर चीनने त्याला आपल्या संरक्षण क्षेत्रात उतरवून युद्धाच्या एका नवीन युगाची सुरुवात केली आहे. चीनची सरकारी संरक्षण कंपनी नोरिन्कोने गेल्या फेब्रुवारी एक लष्करी वाहन सादर केले आहे, जे डीपसीक मॉडेलने सुसज्ज आहे. हे वाहन स्वायत्तपणे युद्ध-सहायक मिशन पूर्ण करू शकते. चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) आपल्या सैन्याला एआय आधारित युद्ध प्रणालींनी सज्ज करत आहे, हा मोठ्या धोरणाचा एक भाग आहे.
डीपसीक हे चीनच्या तंत्रज्ञान क्षेत्राचे प्रचंड मोठे यश मानले जाते आणि आता ते लष्करासाठीही उपयुक्त ठरत आहे. पीएलएने डीपसीकचा वापर करून स्वयंचलित लक्ष्य ओळखणे, रिअल-टाईम युद्ध निर्णय समर्थन आणि एआय ड्रोन नेटवर्किंग यांसारख्या क्षमतांवर काम सुरू केले आहे. डीपसीक एआय आधारित सिस्टीम 48 सेकंदांत 10,000 युद्ध परिस्थितींचे विश्लेषण करू शकते, ज्यासाठी पूर्वी 48 तास लागायचे. चीनने एआय संचालित रोबो डॉग्ज आणि ड्रोन स्वॉर्म्सची (ड्रोनचा समूह) मागणी करणारे टेंडर (निविदा) जारी केले आहे. हे रोबो समूहाने काम करून शत्रूचे तळ शोधतील आणि स्फोटकांचा धोका नष्ट करतील. अमेरिकेने एनव्हिडियाच्या 100 आणि 100 चिप्सच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर, चीनने याला देशांतर्गत तंत्रज्ञानाने उत्तर दिले आहे. पीएलए आणि संबंधित कंपन्या आता त्यांचे सर्व मॉडेल हुआवेईच्या असेंड चिप्सवर प्रशिक्षित करत आहेत. चीनने या धोरणाला ‘एल्गोरिदमिक सॉवेरेनिटी’ असे नाव दिले आहे. याचा अर्थ पाश्चात्त्य तंत्रज्ञानावरील अवलंबित्व संपुष्टात आणणे आणि स्वतःची डिजिटल शक्ती वाढवणे.
शस्त्रास्त्रांवर मानवी नियंत्रण कायम राहील असे जरी चीनचे अधिकारी म्हणत असले, तरी तज्ज्ञांचे मत आहे की युद्धाचे भविष्य आता एआय आधारित प्रणालींकडे वळले आहे. या तंत्रज्ञानाच्या आघाडीला आव्हान देण्यासाठी अमेरिकाही 2025 पर्यंत हजारो स्वायत्त ड्रोन तैनात करण्याची तयारी करत आहे. डीपसीकच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे हे स्पष्ट झाले आहे की, आगामी काळात युद्ध फक्त गोळ्यांनी नव्हे, तर कोड आणि डेटाने लढले जाई. आता युद्धाची रणनीती, गती आणि दिशा एआय मॉडेल्स ठरवतील.