Humanoid robot China | चीनमध्ये अवतरला खरा ‘ट्रान्स्फॉर्मर’ दोन पायांवरून थेट  
विश्वसंचार

Humanoid robot China | चीनमध्ये अवतरला खरा ‘ट्रान्स्फॉर्मर’ दोन पायांवरून थेट

चार पायांवर धावणारा महाकाय रोबो!

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : चिनी अभियंत्यांनी ‘मीका-स्टाईल’ प्रकारातील एका अशा महाकाय ह्युमनॉइड (मानवासारख्या) रोबोची निर्मिती केली आहे, जो माणसाला घेऊन चालताना अचानक दोन पायांवरून चार पायांवर सहज बदलू शकतो. हॉलीवूडचा प्रसिद्ध चित्रपट ‘एलियन्स’ मधील ‘पॉवर-लोडर’ किंवा जपानी अ‍ॅनिम सिरीज ‘गुंडम सीड’ मधील मोबाईल सूटस्सारखा हा रोबो दिसतो. खर्‍या आयुष्यातील हा ‘ट्रान्स्फॉर्मर’ सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

हा महाकाय रोबो चीनमधील ‘युनिट्री’ या प्रसिद्ध रोबोटिक्स स्टार्टअप कंपनीने विकसित केला असून, याचे नाव ‘GD01’ असे ठेवण्यात आले आहे. नागरी वाहतुकीसाठी या रोबोचा वापर करण्याचा कंपनीचा मानस आहे. कंपनीने जारी केलेल्या एका प्रमोशनल व्हिडीओमध्ये, हा रोबो ताठ उभा राहून चालताना, समोर आलेली सिंडर ब्लॉकची (विटांची) उंच भिंत एका फटक्यात जमीनदोस्त करताना आणि कठीण रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी स्वतःला चार पायांच्या रचनेत बदलताना दिसत आहे. चालकासह या मशिनचे वजन सुमारे 1,100 पाउंड (500 किलोग्रॅम) आहे आणि त्याची उंची जवळपास 10 फूट (3 मीटर) आहे.

रोबोचा मुख्य सांगाडा टायटॅनियम धातूचे मिश्रण (Titanium Alloy) आणि एरोस्पेस-ग्रेड अ‍ॅल्युमिनियमपासून बनवला असून, त्यावर कार्बन-फायबरचे कवच देण्यात आले आहे. हा रोबो ग्राहकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध असून, याची किंमत 3.9 दशलक्ष युआन म्हणजेच सुमारे 5,72,000 डॉलर्स (भारतीय चलनानुसार सुमारे 4.7 कोटी रुपये) पासून सुरू होते. युनिट्री कंपनीने या ‘GD01’ ला जगातील पहिला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होणारा ‘ट्रान्स्फॉर्मेबल मीका’ ( Transformable Mecha) म्हटले आहे. तसेच ग्राहकांना हा रोबोट मैत्रीपूर्ण आणि सुरक्षित पद्धतीने वापरण्याचे आवाहन केले आहे. या रोबोटच्या सध्याच्या मॉडेलमध्ये चालकाला आत बसण्यासाठी रोबोच्या पायावरून कसरत करत वर चढून कॉकपीटमध्ये जावे लागते, जी थोडी गैरसोयीची पद्धत आहे. व्हिडिओमध्ये हा रोबो मानवरहित म्हणजेच रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रित केला जात असल्याचेही दिसून आले आहे.

युनिट्री कंपनीने यापूर्वी फेब्रुवारीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांच्या ह्युमनॉइड रोबोट्सचे कसरती, ब्रेक डान्स आणि युद्धकलेचे ( Martial Arts) सादरीकरण करून सर्वांना थक्क केले होते. ’ GD01’ बद्दल कंपनीने अजून संपूर्ण तांत्रिक अहवाल जाहीर केला नसला, तरी कंपनीच्या चार पायांच्या रोबोट्सच्या (उदा. B2 मॉडेल) अनुभवातूनच हा रोबो विकसित करण्यात आला आहे. हे रोबो जिने चढणे, मोठा धक्का बसल्यावरही स्वतःचा तोल सांभाळणे आणि खड्ड्यांवरून उड्या मारण्यात सक्षम आहेत. या रोबोंमध्ये आजूबाजूचा परिसर अचूक पाहण्यासाठी ’फिश-आय बायनोक्युलर डेप्थ-सेन्सिंग कॅमेरे’ वापरले जातात. चीनची ही कंपनी मोटर्स, कंट्रोलर्स, लिडार आणि उच्च क्षमतेच्या मोशन कंट्रोल अल्गोरिदम सारख्या रोबोच्या मुख्य भागांचे स्वतःच संशोधन आणि निर्मिती करण्यासाठी ओळखली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT