बीजिंग : चीनच्या एका अत्यंत गुप्त अंतराळ मोहिमेने इतिहास रचला आहे. चीनच्या एका अंतराळ यानाने पृथ्वीच्या ‘क्वासी-मून’ (Quasi-moon - आभासी किंवा तात्पुरता चंद्र) चा जगातील पहिला वहिला क्लोज-अप (जवळून घेतलेला) फोटो काढला आहे. या अंतराळ खडकावर मानवी इतिहासातील पहिलेवहिले लँडिंग करण्याचा चीनचा मानस आहे.
हे अंतराळ यान या खडकावरून माती व दगडांचे नमुने गोळा करून पुढील वर्षी पृथ्वीवर परतणार आहे. मात्र, चीनने जाहीर केलेला हा अस्पष्ट फोटो आणि तो प्रसिद्ध करण्याची वेळ पाहता, ही मोहीम सुरुवातीला वाटली होती तितकी सोपी नसेल, असे संकेत मिळत आहेत. चायनीज नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (CNSA) चे ‘तियानवेन-२’ हे अंतराळ यान २८ मे २०२५ रोजी दक्षिण चीनमधील शिचांग उपग्रह प्रक्षेपण केंद्रावरून प्रक्षेपित करण्यात आले होते. 'कामूओआलेवा' (Kamo'oalewa - ज्याला 2016 HO3 देखील म्हटले जाते) नावाचा वेगाने फिरणारा लघुग्रह हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
‘कामूओआलेवा’ हा लघुग्रह पृथ्वीचा ‘क्वासी-सॅटेलाईट’ (आभासी उपग्रह) मानला जातो. याचा अर्थ असा की, हा खडक आपल्या ग्रहाच्या सोबतच सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो. त्यामुळे तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने बांधलेला असल्यासारखा भासतो; पण प्रत्यक्षात तसे नाही. हा संबंध केवळ तात्पुरता असून, काही काळाने कामूओआलेवा पृथ्वीच्या कक्षेपासून वेगळा होऊन अंतराळात दूर निघून जाईल. चीनने या तिआनवेन-२ मोहिमेचे तपशील आणि वेळापत्रक अत्यंत गुप्त ठेवले होते. प्रक्षेपणानंतर अनेक आठवड्यांनी त्यांनी या यानाचा पहिला फोटो शेअर केला होता.
एका असत्यापित वेळापत्रकाच्या आधारे, हे यान ७ जून रोजीच ‘कामूओआलेवा’जवळ पोहोचल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता; परंतु चिनी अधिकाऱ्यांनी यावर मौन बाळगले होते. अखेर ६ जुलै रोजी चीनच्या 'शिन्हुआ' या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, CNSA ने अधिकृतपणे पुष्टी केली आहे की, सुमारे ४०० दिवसांचा प्रवास आणि ६ लाख मैलांपेक्षा (१० लाख किलोमीटर) अधिक अंतर पार करून ‘तिआनवेन-२’ आता कामूओआलेवा लघुग्रहाभोवती प्रदक्षिणा घालत आहे. तसेच, ७ जून रोजीच हे यान लघुग्रहाच्या कक्षेत दाखल झाले होते, यावरही चीनने आता शिक्कामोर्तब केले आहे.