लघुग्रहाच्या धडकेपासून चीन वाचवणार पृथ्वीला! Pudhari File Photo
विश्वसंचार

लघुग्रहाच्या धडकेपासून चीन वाचवणार पृथ्वीला!

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : जगाला कोरोना महामारीच्या खाईत लोटणार्‍या चीनला जगाची किती पर्वा आहे हे आतापर्यंत अनेक वेळा दिसून आलेले आहे. स्वतःच्या स्वार्थापुढे जग न पाहणार्‍या या देशाने सध्या अंतराळ संशोधन क्षेत्रात बरीच मोठी मजल मारलेली आहे. स्वतःचे अंतराळ स्थानकही निर्माण केलेल्या चीनने आता जगाला वाचवण्याचाही विडा उचलला आहे. लघुग्रहांच्या संभाव्य धडकेपासून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी चीनने आता कंबर कसली आहे. सध्या ‘2024 वायआर4’ या लघुग्रहाने जगभरातील संशोधकांची चिंता वाढवली आहे. हा लघुग्रह पृथ्वीला 2032 मध्ये धडकण्याची काहीशी शक्यता आहे. आता अशा धडकेपासून पृथ्वीला वाचवण्यासाठी चीनने संशोधकांची एक टीम बनवली आहे.

लघुग्रहांची वेळोवेळी पृथ्वीला धडक झाली आहे. अशाच एका धडकेमुळे पृथ्वीवरून डायनासोरसह अन्य अनेक जीवांच्या प्रजातींचा मोठा संहार झाला होता. या धडकेच्या खुणा आजही मेक्सिकोच्या चिक्सुलबमधील विवराच्या रूपाने पाहायला मिळतात. अशी धडक पुन्हा होऊ नये यासाठी ‘नासा’ही अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थाही प्रयत्नशील आहे व त्यामधूनच ‘डार्ट’ मोहीमही राबवण्यात आली होती. सध्या ‘2024 वायआर4’ ची चिंता आहे. हा लघुग्रह पृथ्वीला धडकण्याची 1.3 टक्के शक्यता असल्याचे यापूर्वी म्हटले जात होते. मात्र, आता ही शक्यता 2.3 टक्के असल्याचे संशोधक म्हणत आहेत. अर्थातच ही शक्यता कमी असली तरी त्याकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही. अशा धडकेतून मोठाच विध्वंस होऊ शकतो. त्यामुळे चीनने आता अशा लघुग्रहांचे निरीक्षण करण्यासाठी तज्ज्ञांची एक टीम बनवली आहे. तसेच लघुग्रहांची दिशा बदलण्यासाठीचे तंत्रज्ञानही चीनमध्ये विकसित केले जात आहे. इंटरनॅशनल अ‍ॅस्टेरॉईड वॉर्निंग नेटवर्क आणि अंतराळ योजनांचे सल्लागार समूहातही चीन सहभागी झाला आहे. दरम्यान, सध्या धोकादायक ठरलेल्या या लघुग्रहाचा आकार 40 ते 90 मीटर दरम्यान आहे. सध्या तो पृथ्वीपासून बर्‍याच दूर अंतरावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT