Lianshine System | सुपरकॉम्प्युटरच्या दुनियेत चीनने अमेरिकेला पछाडले  
विश्वसंचार

Lianshine System | सुपरकॉम्प्युटरच्या दुनियेत चीनने अमेरिकेला पछाडले

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. शेजारील देश चीनने सुपरकॉम्प्युटरच्या दुनियेत अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे. सुपरकंप्युटिंगच्या शर्यतीत अमेरिकेला मागे टाकत चीनने नंबर-१ चा ताज आपल्या नावावर केला आहे. जगातील सर्वात शक्तिशाली सुपरकॉम्प्युटर्सच्या 'TOP500' यादीत चीनच्या 'लाइनशाइन सिस्टम' (Lianshine System) ने अव्वल स्थान पटकावत अमेरिकेच्या वर्चस्वाला सुरुंग लावला आहे.

चीनने सुमारे तीन वर्षांनंतर या यादीत पुनरागमन केले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या सुपरकॉम्प्युटरमध्ये चीनने पूर्णपणे आपल्याच देशात तयार केलेल्या 'डोमेस्टिक चिप्स' (स्वदेशी प्रोसेसर) चा वापर केला आहे. चीनने जरी नंबर १ च्या खुर्चीवर कब्जा केला असला, तरी टेक तज्ज्ञांच्या मते हा विजय केवळ कागदावर किंवा दाखवण्यापुरता मर्यादित आहे. आजच्या काळात तंत्रज्ञान क्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) दबदबा आहे; परंतु चीनचा हा सुपरकॉम्प्युटर 'एआय' च्या कामांसाठी पूर्णपणे सज्ज नाही. जेव्हा 'एआय'शी संबंधित कामांसाठी याची परीक्षा घेण्यात आली, तेव्हा हा सुपरकॉम्प्युटर जगातील क्रमवारीत थेट चौथ्या क्रमांकावर घसरला. सुपरकॉम्प्युटर हा जगातील सर्वात शक्तिशाली, वेगवान आणि आकाराने अत्यंत विशाल असणारा संगणक आहे. आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये वापरल्या जाणाऱ्या सामान्य कॉम्प्युटरपेक्षा तो पूर्णपणे वेगळा आणि लाखो पट जास्त वेगाने काम करतो. याला तुम्ही कॉम्प्युटर्सचा 'बाहुबली' देखील म्हणू शकता. आयबीएम (IBM) च्या एका अहवालानुसार, सामान्य कॉम्प्युटरमध्ये सहसा एकच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (CPU) किंवा प्रोसेसर असतो. परंतु, सुपरकॉम्प्युटरमध्ये एक-दोन नव्हे, तर हजारो प्रोसेसर एकत्र काम करतात. चीनच्या या सुपरकॉम्प्युटरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्णपणे केवळ सीपीयूवर काम करतो. सहसा वेगवान सुपरकॉम्प्युटर्समध्ये 'एआय' च्या कामांसाठी 'जीपीयू' (GPU - ग्राफिक्स चिप) चा वापर केला जातो; परंतु चीनने केवळ सीपीयूच्या बळावर हा पराक्रम केला आहे. हे यंत्र चालवण्यासाठी तब्बल ४२.२ मेगावाट विजेची आवश्यकता भासते.

या शर्यतीत भारत कुठे आहे?

जागतिक सुपरकंप्युटिंगच्या शर्यतीत भारत सध्या 'मिड-लीग' म्हणजेच मध्यम गटात आहे. भारताकडे अमेरिका किंवा चीनसारखे महाकाय सुपरकॉम्प्युटर्स नसले, तरी भारत आपली क्षमता आणि पायाभूत सुविधा वेगाने वाढवत आहे. नवीन TOP500 जागतिक रँकिंगमध्ये भारताचा 'शक्ती क्लाउड' (Shakti Cloud) देशातील सर्वात शक्तिशाली सुपरकॉम्प्युटर ठरला आहे. जगातील टॉप सुपरकॉम्प्युटर्सच्या यादीत शक्ती क्लाउडला ३२ वे स्थान मिळाले आहे. 'योट्टा डेटा सर्व्हिसेस' मध्ये असलेल्या या सुपरकॉम्प्युटरने हाय-परफॉर्मन्स लिनपैक बेंचमार्क टेस्टवर ८४.३१ पेटफ्लॉप्सचा शानदार वेग नोंदवला आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते, भारताच्या या कामगिरीनंतरही जगातील आघाडीचे देश आणि भारतातील टॉप सिस्टम्स यांच्या परफॉर्मन्समध्ये अजूनही खूप मोठे अंतर आहे.

‘परम रुद्र’ सीरिज

भारतातील प्रमुख शैक्षणिक आणि वैज्ञानिक संस्थांमध्ये आतापर्यंत ३८ सुपरकॉम्प्युटर्स 'तैनात' करण्यात आले आहेत, ज्यांची एकूण कॉम्प्युटिंग पॉवर ४७ पेटफ्लॉप्सपर्यंत पोहोचली आहे. 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेअंतर्गत भारताने स्वदेशी 'परम रुद्र' सीरिज तयार केली आहे. या सीरिजचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये भारतातच डिझाईन केलेले हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर वापरले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT