बीजिंग : चीनने तंत्रज्ञानाच्या बाबतीत जगाला पुन्हा एकदा थक्क केले आहे. सोशल मीडियावर सध्या चीनमधील एका अशा रुग्णालयाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जिथे एकही डॉक्टर प्रत्यक्ष हजर नसताना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. हे एआय संचालित क्लिनिक (एआय क्लिनिक) पाहून नेटिझन्स म्हणत आहेत की, ‘चीन सध्या 3026 सालात जगत आहे.
व्हायरल व्हिडीओमधील हे रुग्णालय म्हणजे एक छोटे कियोस्क किंवा केबिन आहे. यामध्ये रुग्णाने प्रवेश केल्यावर त्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे पार पडते.
संवाद : रुग्ण आत गेल्यावर एआय सिस्टीमशी संवाद साधतो. एआय एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांप्रमाणे रुग्णाला लक्षणे, जुनी आजारपण आणि इतर माहिती विचारते.
60 सेकंदांत निदान : सर्व माहिती मिळाल्यावर अवघ्या 1 मिनिटाच्या आत (60 सेकंद) एआय सिस्टीम आजाराचे अचूक आकलन करते.
तज्ज्ञांची पडताळणी : एआयने गोळा केलेला डेटा एका रिमोट (दुसर्या ठिकाणी बसलेल्या) मानवी डॉक्टरांकडे पाठवला जातो. त्यांनी हिरवा कंदील दाखवताच पुढील प्रक्रिया सुरू होते.
झटपट औषधे : निदानानंतर रुग्णाला बाहेर जाण्याची गरज पडत नाही; त्याच मशिनमधून आवश्यक औषधे त्वरित बाहेर येतात.
चीन सरकार अशा प्रकारचे 1000 एआय कियोस्क देशभर बसवण्याच्या तयारीत आहे. यामुळे रुग्णालयांमधील गर्दी कमी होण्यास आणि ग्रामीण भागात त्वरित आरोग्य सेवा पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे. तासन्तास रांगेत उभे राहण्यापेक्षा अवघ्या काही मिनिटांत उपचार मिळवण्याचा हा मार्ग आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवणारा ठरत आहे. जागतिक स्तरावर चर्चा सोशल मीडियावर या तंत्रज्ञानाचा व्हिडीओ पाहून जगभरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भारतातही अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाची गरज आहे का, यावर चर्चा रंगली आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते, गंभीर आजारांसाठी मानवी डॉक्टरांची गरज असली तरी, सर्दी, ताप आणि प्राथमिक उपचारांसाठी हे एआय क्लिनिक अत्यंत प्रभावी ठरू शकते.