First Commercial Brain Chip | चीनमध्ये रुग्णाच्या मेंदूत बसवली पहिली व्यावसायिक ‘ब्रेन चिप’  
विश्वसंचार

First Commercial Brain Chip | चीनमध्ये रुग्णाच्या मेंदूत बसवली पहिली व्यावसायिक ‘ब्रेन चिप’

एलन मस्कच्या ‘न्यूरालिंक’ला मागे टाकत चीनने मारली बाजी

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : मानवी मेंदू आणि कॉम्प्युटरला थेट जोडणाऱ्या ‘ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस’ (BCI) तंत्रज्ञानात भारताचा शेजारी देश असलेल्या चीनने एक मोठे यश संपादन केले आहे. अर्धांगवायू (लकवा) सारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी हे तंत्रज्ञान भविष्यात वरदान ठरू शकते. या क्षेत्रात अमेरिकन अब्जाधीश एलन मस्क यांची ‘न्यूरालिंक’ कंपनी सध्या अमेरिकेत केवळ मानवी चाचण्या (ह्युमन क्लिनिकल ट्रायल्स) करत आहे. मात्र, चीनने या चाचण्यांच्या पुढे जात मोठी झेप घेतली असून, जगातील पहिली ‘कमर्शियल’ (व्यावसायिक विक्रीसाठी सज्ज असलेली) ब्रेन चिप रुग्णाच्या मेंदूत यशस्वीरित्या ट्रान्सप्लांट (प्रत्यारोपित) केल्याचा दावा केला आहे.

‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तानुसार, ही शस्त्रक्रिया केवळ एखादा वैद्यकीय प्रयोग किंवा क्लिनिकल रिसर्च नाही, तर या उपकरणाला बाजारात विकण्याची आणि वापरण्याची पूर्ण मंजुरी मिळाली आहे. चीनमधील ही ऐतिहासिक शस्त्रक्रिया शांघायमधील प्रसिद्ध ‘हुआशान हॉस्पिटल’मध्ये करण्यात आली. ज्या रुग्णाच्या मेंदूत ही चिप बसवण्यात आली आहे, त्याचा १० वर्षांपूर्वी एक भीषण कार अपघात झाला होता. या अपघातात पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याच्या दोन्ही हातांनी काम करणे बंद केले होते.

या रुग्णाच्या मेंदूत एका नाण्याच्या आकाराची ब्रेन चिप बसवण्यात आली असून, तिला ‘NEO’ असे नाव देण्यात आले आहे. ही चिप शांघायमधील ‘न्यूराकल मेडिकल टेक्नॉलॉजी’ या स्टार्टअप कंपनीने तयार केली आहे. एलन मस्क यांच्या ‘न्यूरालिंक’ चिपच्या उलट, ही चिप मेंदूच्या अतिशय नाजूक पेशींच्या आत घुसत नाही, तर ती मेंदूच्या बाह्य पृष्ठभागावर ठेवली जाते. त्यामुळे ही पद्धत अत्यंत सुरक्षित मानली जात आहे. हे उपकरण मेंदूच्या लहरी वाचते आणि त्यांचे रूपांतर हाताच्या हालचालींमध्ये करते, जेणेकरून रुग्ण पुन्हा आपले हात हलवू शकेल.

शांघाय सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशनच्या माहितीनुसार, शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती पूर्णपणे ठीक असून, चिप कडून मिळणाऱ्या सिग्नल्सची गुणवत्ताही उत्तम आहे. चीनच्या ‘नॅशनल मेडिकल प्रॉडक्ट्स ॲडमिनिस्ट्रेशन’ (NMPA) ने याच वर्षी मार्च महिन्यात या उपकरणाच्या व्यावसायिक वापराला मंजुरी दिली होती. मंजुरी मिळाल्यानंतर कंपनीने या चिपचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केले आहे. रुग्णालयांमध्ये रुग्णांची तपासणी केली जात असून, दिलासादायक बाब म्हणजे या उपचाराचा तिथल्या स्थानिक कमर्शियल हेल्थ इन्शुरन्समध्येही (आरोग्य विमा) समावेश करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT