China moon exploration mission | चंद्राचे रहस्य उलगडण्यासाठी चीनचे ‘रिमे बोदे’ केंद्रावर लक्ष 
विश्वसंचार

China moon exploration mission | चंद्राचे रहस्य उलगडण्यासाठी चीनचे ‘रिमे बोदे’ केंद्रावर लक्ष

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : चंद्राच्या गूढ रहस्यांचा शोध घेण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ अहोरात्र संशोधन करत आहेत. याच दरम्यान अमेरिका आणि चीन यांच्यातील ‘लूनार रेस’ (चंद्रावर पोहोचण्याची स्पर्धा) अधिक तीव्र झाली आहे. भारताचा शेजारी देश असलेला चीन 2030 पर्यंत आपल्या अंतराळवीरांना चंद्रावर उतरवण्याच्या तयारीत आहे. ताज्या संशोधनानुसार, चीन चंद्रावरील एका अत्यंत खास आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी आपले मिशन पाठवणार असल्याचे समोर आले आहे. ‘नासा’ आणि जगातील इतर अंतराळ संस्था सध्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील गडद क्रेटर्समध्ये पाण्याचा शोध घेत आहेत. मात्र, चीनने आपला मार्ग थोडा वेगळा निवडला आहे. मीडिया रिपोर्टस् आणि नवीन संशोधनानुसार, चीन ‘साऊथ पोल-एटकेन बेसिन’ जवळ असलेल्या ‘रिमे बोदे’ नावाच्या जागेची निवड करू शकतो.

शास्त्रज्ञांच्या मते, ही जागा चंद्राचा इतिहास जाणून घेण्यासाठी एखाद्या ‘जिओलॉजिकल म्युझियम’ (भूगर्भीय संग्रहालय) सारखी आहे. जिथे इतर देश बर्फाचा शोध घेत आहेत, तिथे चीनची नजर या खास भागावर आहे. ‘नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, रिमे बोदे हा परिसर विज्ञानासाठी एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही. येथे मोठ्या प्रमाणात ‘पायरोक्लास्टिक डिपॉझिटस्’ म्हणजेच ज्वालामुखीच्या काचेसारखे दाणे उपलब्ध आहेत. सुमारे 3 अब्ज वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून हे दाणे निर्माण झाले असावेत, असा अंदाज आहे.

या दाण्यांमध्ये चंद्र आणि पृथ्वीच्या उत्पत्तीशी संबंधित अनेक न सुटलेली रहस्ये दडलेली असू शकतात, म्हणूनच शास्त्रज्ञ याला ‘सायंटिफिक गोल्ड’ असेही संबोधतात. ‘नासा’च्या जुन्या अपोलो मिशनच्या तुलनेत चीन एक प्रगत आणि टप्प्याटप्प्याने विकसित केलेली तंत्रज्ञान प्रणाली वापरणार आहे : दोन रॉकेटचे प्रक्षेपण : चीन दोन ‘लाँग मार्च 10’ रॉकेट चंद्रावर पाठवेल. अवकाशात भेट : एका रॉकेटमध्ये ‘मेंगझू’ स्पेसक्राफ्ट असेल आणि दुसर्‍यामध्ये ‘लॅन्युए’ लँडर. हे दोन्ही भाग अवकाशात एकमेकांना जोडले जातील, त्यानंतर अंतराळवीर लँडरमध्ये बसून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरतील. चंद्रावर उतरल्यानंतर चिनी अंतराळवीर ‘तांसुओ’ नावाच्या प्रगत रोव्हरचा वापर करतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT