बीजिंग : मानव आणि इतर पृष्ठवंशीय जीवांच्या जबड्याची उत्पत्ती नेमकी कशी झाली, यावर प्रकाश टाकणारा एक अत्यंत महत्त्वाचा शोध चीनमधील संशोधकांनी लावला आहे. दक्षिण चीनमध्ये वैज्ञानिकांना चार प्राचीन माशांचे जीवाश्म सापडले असून, हे जीवाश्म सुमारे 436 ते 439 दशलक्ष वर्षांपूर्वीचे आहेत. विशेष म्हणजे, हे आतापर्यंतचे ज्ञात असलेले सर्वात जुने ‘जबडा असलेले पृष्ठवंशीय’ जीव आहेत. या शोधामुळे उत्क्रांतीच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या टप्प्याची माहिती समोर आली असून, यापूर्वी या कालखंडातील माशांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नव्हती.
संशोधनानुसार, हे प्राचीन मासे आकाराने अत्यंत लहान होते. यामध्ये ‘जियुशानोस्टियस मिराबिलिस’ नावाचा मासा अवघा 3 सेंटीमीटर लांब होता, ज्याच्या शरीराचा पुढचा भाग हाडांच्या ढालीसारखा मजबूत होता आणि मागचा भाग सामान्य माशाप्रमाणे होता. त्याचप्रमाणे, शार्कशी संबंधित असलेल्या ‘शेनाकँथस वर्मीफॉर्मिस’ या माशाचा जबडा कमकुवत आणि दातविरहित होता, जो केवळ मऊ जीवांचे भक्षण करून जगत असे. या व्यतिरिक्त, चीनच्या गुइझोऊ प्रांतात 4 इंच लांबीच्या ‘कियानोडस डुप्लिकिस’ आणि 6 इंच लांबीच्या ‘फॅन्जिंगशानिया रेनोवाटा’ या माशांचे जीवाश्मही सापडले आहेत.
‘कियानोडस डुप्लिकिस’ हा जगातील सर्वात प्राचीन दात असलेला पृष्ठवंशीय जीव म्हणून ओळखला गेला आहे, ज्याचे दात वक्र होते आणि ते आयुष्यभर पुन्हा पुन्हा येत असत. ‘फॅन्जिंगशानिया’मध्ये हाडांच्या ढालीसह अनेक वैशिष्ट्ये आढळली असून, हे दोन्ही जीव शार्क वंशाचे सर्वात जुने ज्ञात सदस्य मानले जात आहेत. या अभूतपूर्व शोधामुळे पृष्ठवंशीय जीवांच्या शारीरिक संरचनेचा विकास कसा झाला, हे समजण्यास मोठी मदत होणार आहे.