AI Mosquito Killer | चीनने बनवले ‘एआय’ आणि लेसर तंत्रज्ञानयुक्त डास मारण्याचे उपकरण 
विश्वसंचार

AI Mosquito Killer | चीनने बनवले ‘एआय’ आणि लेसर तंत्रज्ञानयुक्त डास मारण्याचे उपकरण

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : दरवर्षी २० ऑगस्ट रोजी जगभरात ‘जागतिक डास दिन’ (World Mosquito Day) साजरा केला जातो. डासांमुळे होणाऱ्या मलेरिया आणि डेंग्यूसारख्या धोकादायक आजारांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. मात्र, यंदाच्या डास दिनानिमित्त कोणत्याही औषधाची किंवा स्प्रेची नाही, तर एका अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाची चर्चा होत आहे. चीनमधील एका छोट्या स्टार्टअपच्या कामगिरीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. आता डास पळवून लावण्यासाठी विषारी धूर किंवा कॉईलची गरज भासणार नाही; कारण चीनने ‘एआय’ आणि लेसर तंत्रज्ञानाने सज्ज असे एक अनोखे ‘मॉस्किटो जॅपर’ तयार केले आहे.

चीनच्या चांगझोऊ शहरात असलेल्या ‘फोटॉन मॅट्रिक्स लॅब’ या स्टार्टअपने ही पोर्टेबल लेसर मॉस्किटो डिफेन्स सिस्टीम विकसित केले आहे. हे डिव्हाईस एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटातील गॅझेटसारखे दिसते. हे डिव्हाईस ‘एआय’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि LiDAR सेन्सरचा वापर करून हवेत उडणाऱ्या डासांचे अचूक लोकेशन ट्रॅक करते. डास याच्या रेंजमध्ये येताच, ही सिस्टीम एक अचूक लेसर बीम सोडून डासाचा खात्मा करते. या गॅझेटची निर्मिती आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी कंपनीने ‘Indiegogo’ या क्राऊडफंडिंग प्लॅटफॉर्मवर मोहीम सुरू केली होती. सुरुवातीला कंपनीने केवळ २०,००० डॉलर्स उभारण्याचे लक्ष्य ठेवले होते. परंतु, ही संकल्पना लोकांना इतकी आवडली की कंपनीने तब्बल २.७ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (सुमारे २२ कोटी रुपये) जमा केले. जगभरातील ५० हून अधिक देशांमधील ४,००० हून अधिक लोकांनी हे प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी सुमारे ६३० डॉलर्स (सुमारे ५२,००० रुपये) ॲडव्हान्स दिले आहेत.

मानव आणि डोळ्यांसाठी सुरक्षित आहे का?

लेसर बीमचे नाव ऐकताच सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण होतो. हा लेसर कोणत्याही माणसाच्या किंवा पाळीव प्राण्याच्या डोळ्यांना इजा तर पोहोचवणार नाही ना? यावर कंपनीने स्पष्ट केले आहे की, सुरक्षेच्या नियमांची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. या डिव्हाईसमध्ये ट्रिपल ॲक्टिव्ह सेफ्टी प्रोटेक्शन देण्यात आले आहे. यामध्ये रडारच्या माध्यमातून माणसांच्या उपस्थितीचा शोध घेतला जातो आणि एक अनिवार्य बॅकग्राऊंड चेक मेकॅनिझम काम करतो. लेसरसमोर कोणतीही व्यक्ती किंवा पाळीव प्राणी आल्यास लेसर फायर होणार नाही. कंपनी यावर्षी युरोपियन युनियनचे ‘CE सेफ्टी सर्टिफिकेशन’ मिळवण्याच्या दिशेने काम करत असून अमेरिकेत FDA नोंदणीसाठी अर्ज करण्याची तयारी करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT