बीजिंग : ऊर्जा साठवणुकीच्या क्षेत्रात चीनने एक मोठे पाऊल उचलले असून, जगातील सर्वात मोठा ‘लिक्विड एअर एनर्जी स्टोअर’ प्रकल्प उभारला आहे. गोबी वाळवंटातील किंगहाई प्रांतात, गोलमुड शहराबाहेर हा प्रकल्प साकारत आहे. याला शास्त्रज्ञांनी ‘सुपर कोल्ड एअर बॅटरी’ असे नाव दिले आहे.
या प्रकल्पात पांढर्या रंगाच्या महाकाय टाक्यांची एक रांग आहे. येथे हवेवर प्रचंड दबाव देऊन तिला उणे 194 अंश सेल्सिअसपर्यंत थंड केले जाते. या प्रक्रियेमुळे हवेचे रूपांतर द्रवात होते. जेव्हा विजेची गरज भासते, तेव्हा या द्रव हवेला पुन्हा गरम केले जाते. गरम झाल्यावर ही हवा वेगाने प्रसरण पावते आणि त्या दाबाने टर्बाइन्स फिरवून वीज निर्माण केली जाते. इंटरेस्टिंग इंजिनिअरिंगच्या अहवालानुसार, या प्रकल्पाला ‘सुपर एअर पॉवर बँक’ असेही म्हटले जात आहे. हा प्लांट एका वेळी 6 लाख किलोवॅट प्रतितास वीज देऊ शकतो आणि सलग 10 तास चालू शकतो. वर्षभरात यातून सुमारे 18 कोटी युनिट वीज तयार होईल, जी साधारण 30 हजार घरांची गरज भागवण्यासाठी पुरेशी आहे.
हा प्रकल्प ‘चीन ग्रीन डेव्हलपमेंट इन्व्हेस्टमेंट ग्रुप’ आणि ‘चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आला आहे. सौर आणि पवन ऊर्जेची निर्मिती निसर्गावर अवलंबून असल्याने ती कधी जास्त, तर कधी कमी होते, ज्यामुळे ग्रीडमध्ये चढ-उतार होतात. हा प्रकल्प गोबी वाळवंटातील 2.5 लाख किलोवॅटच्या सोलर फार्मशी जोडण्यात आला आहे. संशोधक वांग जुनजी यांच्या मते, ‘सौर आणि पवन ऊर्जेतील चढ-उतारामुळे पुरवठा आणि मागणीत संतुलन राखणे कठीण होते. हा प्लांट अतिरिक्त ऊर्जा साठवून ठेवेल आणि गरजेच्या वेळी पुरवठा करून ग्रीड स्थिर ठेवण्यास मदत करेल.’ हा प्रकल्प केवळ वीज साठवत नाही, तर हवेतील प्रदूषण साफ करून तिचा वापर करतो. लिथियम बॅटरीच्या तुलनेत या लिक्विड एअर बॅटरीचे आयुष्य जास्त असते आणि त्या पर्यावरणासाठी अधिक सुरक्षित मानल्या जातात.