बीजिंग : एका ऊर्जा कंपनीने दक्षिण चीनच्या समुद्रात जगातील सर्वात मोठ्या ‘सिंगल-युनिट’ तरंगत्या पवनचक्कीची (Floating offshore wind turbine) यशस्वी उभारणी केली आहे. ‘थ्री गॉर्जेस पायलट’ नावाचे हे 16 मेगावॅट क्षमतेचे युनिट ग्वांगडोंग प्रांतातील यांगजियांग जवळील अतिशय खोल समुद्रात स्थापित करण्यात आले आहे, जिथे पारंपरिक पद्धतीने समुद्राच्या तळाशी खांब रोवून पवनचक्की उभारणे अशक्य होते. कंपनीच्या प्रतिनिधींनी 3 मे रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात या यशस्वी मोहिमेची माहिती दिली.
‘चायना थ्री गॉर्जेस’ (CTG) कॉर्पोरेशनने या पवनचक्कीची निर्मिती केली आहे. या युनिटचा रोटर 827 फूट (252 मीटर) व्यासाचा असून, त्याच्या पात्याचे टोक समुद्राच्या पाण्यापासून 886 फूट (270 मीटर) पेक्षा जास्त उंचीवर जाते. चीनने गेल्या वर्षी ‘चायना हुआनेंग ग्रुप’ आणि ‘डोंगफांग इलेक्ट्रिक कॉर्प’ द्वारे तैनात केलेल्या पवनचक्कीच्या धर्तीवरच ही नवी रचना केली आहे. मात्र, ‘थ्री गॉर्जेस’च्या या नव्या मॉडेलमध्ये स्ट्रक्चरल आणि सिस्टम इंजिनिअरिंगच्या पातळीवर मोठे आणि महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. हा नवा प्लॅटफॉर्म खोल समुद्रातील अत्यंत प्रतिकूल हवामानाचा सामना करण्यासाठी डिझाईन केला गेला आहे.
समुद्रात उठणार्या 66 फुटांपेक्षा (20 मीटर) उंच लाटा आणि ताशी 164 मैल (264 कि.मी./तास) वेगाने वाहणारे वारे, म्हणजेच ‘कॅटेगरी 5’ च्या अत्यंत विनाशकारी चक्रीवादळातही हा प्लॅटफॉर्म सुरक्षितपणे टिकून राहू शकतो. प्लॅटफॉर्मला स्थिर ठेवण्यासाठी आणि त्याला वाहून जाण्यापासून रोखण्यासाठी कंपनीने यात एक अत्याधुनिक ‘मूरिंग सिस्टम’ वापरली आहे. यामध्ये सक्शन अँकर्स, अँकर चेन्स आणि अत्यंत मजबूत पॉलिस्टर दोर्यांचा वापर करण्यात आला आहे. सोबतच, बॅलास्ट (पाण्याचा समतोल राखणारी यंत्रणा) आणि डिजिटल मॉनिटरिंग सिस्टमच्या मदतीने या महाकाय पवनचक्कीची स्थिरता कायम राखली जाते.
ज्या समुद्रात पाण्याची खोली खूप जास्त असते, तिथे जमिनीवर आधारित किंवा समुद्राच्या तळाशी पक्के बांधकाम करून पवनचक्की उभारणे व्यवहार्य नसते. अशा ठिकाणी हे तरंगते तंत्रज्ञान काम करते. यामध्ये पवनचक्की एका महाकाय तरंगत्या प्लॅटफॉर्मवर बसवली जाते, जो साखळ्यांच्या साहाय्याने समुद्रात एका जागी स्थिर केला जातो. यामुळे महासागरातील मोठ्या क्षेत्राचा वापर पवन ऊर्जेसाठी करणे शक्य झाले आहे.