बीजिंग : स्वच्छ आणि अमर्याद ऊर्जेच्या शोधात असलेल्या मानवजातीसाठी चीनने एक मोठे पाऊल उचलले आहे. चीनचा अणुसंलयन (न्युक्लियर फ्युजन) अणुभट्टी प्रकल्प, ज्याला ‘कृत्रिम सूर्य’ म्हटले जाते, त्याने प्लाझ्माच्या घनतेची मर्यादा ओलांडून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ‘चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस’ने दिलेल्या माहितीनुसार, या यशामुळे मानवाला भविष्यात कधीही न संपणारी ऊर्जा मिळण्याच्या आशा उंचावल्या आहेत.
चीनच्या ‘एक्सपेरिमेंटल ॲडव्हान्स्ड सुपरकंडक्टिंग टोकामाक’ (एअडढ) या अणुभट्टीने प्लाझ्माच्या (पदार्थाची चौथी अवस्था) अत्यंत उच्च घनतेवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले आहे. आतापर्यंत अणुसंलयन प्रक्रियेत प्लाझ्माची घनता स्थिर राखणे हे संशोधकांसमोर मोठे आव्हान होते. या प्रयोगाचे सहलेखक आणि युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक पिंग झू यांच्या मते, हे संशोधन पुढील पिढीच्या अणुभट्ट्यांसाठी आणि जळत्या प्लाझ्मा उपकरणांच्या निर्मितीसाठी एक व्यावहारिक मार्ग दाखवते. या प्रक्रियेतून कोळसा किंवा तेलासारखे प्रदूषणकारी इंधन न वापरता अमर्याद स्वरूपात वीज निर्मिती होऊ शकते. यामध्ये घातक किरणोत्सर्गी कचरा निर्माण होत नाही आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जनही होत नाही.
वैज्ञानिकांच्या मते, पुढील काही दशकांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करून जगाची ऊर्जेची गरज पूर्ण केली जाऊ शकते. अणुसंलयन प्रक्रियेत दोन हलके अणू एकत्र येऊन एक जड अणू तयार होतो, ज्यातून प्रचंड ऊर्जा मुक्त होते. हीच प्रक्रिया सूर्याच्या केंद्रस्थानी घडते. मात्र, सूर्यावर असलेले नैसर्गिक गुरुत्वाकर्षण आणि दाब पृथ्वीवर निर्माण करण्यासाठी वैज्ञानिकांना प्रचंड तापमानाचा (सूर्यापेक्षाही जास्त उष्णता) वापर करावा लागतो.