Chinese Spying | बोगस कन्सलटन्सीद्वारे चीन करतेय हेरगिरी बोगस कन्सलटन्सीद्वारे चीन करतेय हेरगिरी 
विश्वसंचार

Chinese Spying | बोगस कन्सलटन्सीद्वारे चीन करतेय हेरगिरी

अरुण पाटील

वॉशिंग्टन : सध्याचे आणि माजी अमेरिकन सरकारी अधिकारी, पत्रकार तसेच व्यापार सल्लागार यांच्याकडून गोपनीय माहिती काढून घेण्यासाठी संशयित चिनी हेरांनी बोगस कन्सल्टन्सी कंपन्यांचे एक मोठे जाळे विणले असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पारंपरिक गुप्तहेरगिरीपेक्षा वेगळी पद्धत वापरत, चीन ‘लिंक्डइन’सारख्या व्यावसायिक नेटवर्किंग वेबसाईटस्‌चा वापर करून अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित माहिती मिळवत आहे.

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या काळात हजारो संघीय कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. सुरक्षा मंजुरी असलेल्या या बेरोजगार अधिकाऱ्यांना परकीय हेरगिरीपासून वाचवण्यासाठी सरकारकडून पुरेशी मदत किंवा मार्गदर्शन मिळाले नाही. याचाच फायदा घेत चीन आणि रशिया सारख्या देशांनी या नाराज आणि नोकरीच्या शोधात असलेल्या माजी अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. आम्ही स्वतःहून ही असुरक्षितता निर्माण केली, अशी कबुली एका माजी वरिष्ठ अमेरिकन गुप्तचर अधिकाऱ्याने दिली आहे.

जून महिन्यात अमेरिकन तपास संस्था 'एफबीआय'ने अशा १३ बोगस वेबसाईटस्‌ जप्त केल्या होत्या. मात्र, 'फाऊंडेशन फॉर डिफेन्स ऑफ डेमोक्रसीज'चे विश्लेषक मॅक्स लेसर यांच्या मते, ही तर फक्त हिमनगाची टोके आहेत. अशी १०० हून अधिक डोमेन्स अद्याप कार्यरत आहेत. अमेरिका आणि त्यांच्या 'फाइव्ह आइज' (ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, ब्रिटन) मित्र राष्ट्रांनीही या धोक्याबाबत सावध केले आहे. दुसरीकडे, चीनने हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, ही चीनची प्रतिमा मलीन करण्याची चाल असल्याचे म्हटले आहे.

पेंटागॉनचे माजी अधिकारी वेस ब्रायंट यांना एका मलेशियन थिंक टँकच्या नावाखाली अहवाल लिहिण्यासाठी १,२०० डॉलर्स मिळाले. मात्र, समोरची व्यक्ती संशयास्पद वाटल्याने त्यांनी केवळ सार्वजनिक माहिती असलेला अहवाल दिला आणि उलट त्या हेरांचीच माहिती काढण्याचा प्रयत्न केला. जॉर्जटाऊन विद्यापीठाचे विद्यार्थी आंद्रेस लोरेटडेमोला यांनीही एका संशयित चिनी महिलेशी झूम कॉलवर संवाद साधून त्याचे रेकॉर्डिंग एफबीआयला सोपवले.या प्रकरणाने आधुनिक युगात सोशल मीडिया आणि एआयच्या माध्यमातून राष्ट्रीय सुरक्षेला किती मोठा धोका निर्माण झाला आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

कशी करतात हेरगिरी?

बनावट वेबसाईटस्‌ : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि चोरलेल्या ओळखीचा वापर करून अत्यंत आकर्षक कॉर्पोरेट वेबसाईटस्‌ तयार केल्या जातात.

आकर्षक मानधन : लिंक्डइनवर चीन किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडींशी संबंधित सल्लागार पदांसाठी चांगल्या पगाराच्या जाहिराती दिल्या जातात.

माहितीचे संकलन : माजी अधिकाऱ्यांकडून विशिष्ट विषयांवर संशोधन अहवाल मागवले जातात. जरी एका अहवालातून मोठी गोपनीय माहिती मिळाली नाही, तरी अशा शेकडो अहवालांची सांगड घालून चीन अमेरिकन धोरणांचा आणि कमकुवत दुव्यांचा अचूक अंदाज बांधतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT