बीजिंग : जगात बहुतांश लोक आपली संपत्ती, पैसा अडका, कमाई, दागिने आपले जवळचे सख्खे नातेवाईक, वंशजांच्या नावावर करतात; पण चीनमधील १९ वर्षांचा एक मुलगा अपवाद ठरला आहे. त्याने आपली सगळी संपत्ती बालपणीच्या मित्राच्या नावावर केली. या निर्णयामुळे ली चर्चेमध्ये आहे.
ली याचे वय अवघं १९ वर्ष आहे. या वयात बहुतांश लोकांना शिक्षण, करिअर आणि भविष्याची चिंता असते; पण ली आपल्या मित्राची जास्त काळजी होती. ली चीनच्या शंघाई शहरात राहतो. त्याने जवळ २ कोटी युआन म्हणजे जवळपास २८ कोटी रुपयांची संपत्ती बालपणीच्या मित्राच्या नावावर केली. त्याने आपलं इच्छापत्र रजिस्टर्ड केलं आहे. ली च्या प्रॉपर्टीमध्ये एक अपार्टमेंट आणि बँकेमध्ये जमा रकमेचा समावेश आहे. ली याला ॲडव्हेंचर आणि एक्सट्रीम स्पोर्टस्ची आवड आहे. अशा खेळांमध्ये धोका जास्त असतो. म्हणून त्याने ठरवलंय की, त्याच्यासोबत कुठली दुर्घटना घडली तर त्याची संपत्ती कोणाला मिळाली पाहिजे. आई-वडिलांच्या जोडीदाराला त्याच्या संपत्तीचा फायदा मिळू नये, अशी त्याची इच्छा होती. त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला आहे. दोघांनी पुन्हा नव्याने संसार थाटला आहे. ली त्याच्या आई-वडिलांच्या विद्यमान जोडीदारांना आपल्या कुटुंबाचा भाग मानत नाही. म्हणून त्याने सगळी संपत्ती मित्राच्या नावावर केली आहे. या मित्रावर त्याचा प्रचंड विश्वास आहे.
चीनच्या उत्तराधिकारी कायद्यानुसार, जर एखादा व्यक्ती अविवाहित आहे, त्याला मुलं नाहीत, तर सामान्य परिस्थितीत आई-वडील कायदेशीर उत्तराधिकारी ठरतात. पण, कोणा व्यक्तीने कायदेशीरदृष्ट्या वैध इच्छापत्र तयार केलं, तर तो कुटुंबाबाहेर कोणाच्या नावावरही ती संपत्ती करू शकतो. रिपोर्टनुसार, ली ने शंघाई येथील चायना विल रजिस्ट्रेशन सेंटरमध्ये आपल्या इच्छापत्राची नोंदणी केली आहे. नियमांनुसार इच्छापत्रामध्ये ज्या व्यक्तीचं नाव आहे, त्याने संबंधिताच्या मृत्यूनंतर ६० दिवसांच्या आत संपत्ती स्वीकारायची असते. वेळेत क्लेम केला नाही, तर तो अधिकार गमावू शकतो.