Child Dies Rabies | झोपेत चेहऱ्यावर बसले वटवाघूळ; ११ वर्षांच्या मुलाचा रेबीजमुळे मृत्यू 
विश्वसंचार

Child Dies Rabies | झोपेत चेहऱ्यावर बसले वटवाघूळ; ११ वर्षांच्या मुलाचा रेबीजमुळे मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

ऑन्टारिओ : कॅनडातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. कॅनडातील एक ११ वर्षांचा मुलगा आपल्या कुटुंबासह ऑन्टारिओ येथील एका कॉटेजमध्ये सुट्ट्या घालवण्यासाठी गेला होता. रात्री झोपेत असताना अचानक त्याची डोळे उघडले, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वटवाघूळ बसलेले होते. मुलाने हाताने मारून त्या वटवाघळाला बाजूला केले आणि त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्या जीवाला पकडून कॉटेजबाहेर काढून दिले. या घटनेनंतर काही दिवसांतच त्याचा रेबीजमुळे मृत्यू झाला!

मुलाच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारच्या जखमेच्या किंवा चावल्याच्या खुणा नव्हत्या, तसेच त्याला कोणताही त्रास होत नव्हता. त्यामुळे कुटुंबीयांनी या घटनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. या घटनेच्या १९ दिवसांनंतर मुलाच्या चेहऱ्यावर सूज येऊ लागली आणि चेहरा बधिर (सुन्न) झाल्यासारखा वाटू लागला. घरच्यांनी त्याला तातडीने रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात (इमर्जन्सी) नेले. सुरुवातीला डॉक्टरांनी त्याला हर्पिसच्या व्हायरल इन्फेक्शनमुळे होणाऱ्या 'बेल्स पाल्सी'चा (Bell's Palsy - चेहऱ्याचा पक्षाघात) त्रास समजून उपचार केले. मात्र, वारंवार रुग्णालयात जाऊनही तब्येत सुधारली नाही, उलट ती अधिकच खालावल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या दरम्यान मुलाला तीव्र ताप, अन्न किंवा पाणी गिळण्यास त्रास होणे, गोंधळ उडणे आणि भ्रम होणे असा त्रास सुरू झाला. तपासणीअंती, त्याला वटवाघळांमुळे होणाऱ्या रेबीज व्हायरसच्या व्हेरियंटची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. रुग्णालयात दाखल केल्याच्या १७ दिवसांनंतर या चिमुरड्याचा मृत्यू झाला. वेळेवर लस घेतल्यास रेबीजपासून बचाव केला जाऊ शकतो. मात्र, एकदा का रेबीजची लक्षणे शरीरात दिसू लागली, तर हा आजार अत्यंत जीवघेणा ठरतो.

रेबीजग्रस्त प्राण्याने चावल्यास, ओरबाडल्यास किंवा त्याची लाळ मानवी शरीरावरील जखम, डोळे, तोंड यांच्या थेट संपर्कात आल्यास हा आजार पसरतो. यासाठी प्राण्याने चावणेच गरजेचे नाही, तर त्याचा संसर्गजन्य संपर्कही पुरेसा ठरतो. 'डब्ल्यूएचओ'च्या मते, जगातील ९९ टक्के रेबीजची प्रकरणे ही कुत्र्यांमुळे होतात. यामध्ये ५ ते १४ वर्षे वयोगटातील मुले सर्वात जास्त बळी पडतात. कुत्र्यांव्यतिरिक्त वटवाघूळ आणि जंगली प्राण्यांच्या माध्यमातूनही रेबीज पसरू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT