नवी दिल्ली : तुम्ही अनेक लोकांना पाहिले असेल की फोन लॅपटॉपला चार्जिंगला लावतात. असे प्रत्येकजण आपल्या सोयीसाठी करतात. पण, असे करणे धोकादायक ठरू शकते. स्मार्टफोनला त्याच्या मूळ चार्जरनेच चार्ज करणे उत्तम आहे. दुसरीकडे, जर तुम्ही प्रवास करत असाल किंवा तुमच्याकडे अॅडॉप्टर नसेल आणि फोनची बॅटरी संपणार असेल, दुसरा कोणताच पर्याय नसेल तर तुम्ही तो लॅपटॉपने चार्ज करू शकता. पण, असे नेहमीच करणे योग्य नाही. याचा फोनवर काय परिणाम होतो हे जाणून घेऊया.
जेव्हा तुम्ही तुमचा मोबाईल फोन मूळ चार्जर किंवा अॅडॉप्टरने चार्ज करता तेव्हा चार्जिंगचा वेग फास्ट असतो. लॅपटॉपच्या यूएसबी पोर्टने फोन चार्ज करण्याचा वेग कमी होतो. कारण बहुतेक लॅपटॉपचा यूएसबी 2.0 पोर्ट फक्त 0.5 अँपिअर देतो आणि यूएसबी 3.0 पोर्ट 0.9 अँपिअर पॉवर देतो. तर फोन चार्जर 2 अँपिअर किंवा त्याहून अधिक पुरवठा करतो. ज्यामुळे फोन जलद चार्ज होतो.
चार्जिंग करताना मोबाईल फोन लॅपटॉपशी जोडणे टाळावे. कारण, दोन्ही उपकरणांची पॉवर हाताळण्याची क्षमता वेगळी आहे. अशा परिस्थितीत लॅपटॉप किंवा मोबाईल फोनमध्ये शॉर्ट सर्किट देखील होऊ शकते.
कमी व्होल्टेज आणि वीज पुरवठ्याचा फोनच्या बॅटरीवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही लॅपटॉप किंवा अनियमित वीज पुरवठा देणार्या उपकरणाने तुमचा फोन बराच काळ चार्ज करत राहिलात, तर त्याचा तुमच्या मोबाईल फोनच्या बॅटरी आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो , ज्यामुळे बॅटरीची कार्यक्षमता आणि आयुष्यमान कमी होऊ शकते.
लॅपटॉपवरून फोन हळूहळू चार्ज होतो. त्यामुळे आपण मोबाईल फोन बराच वेळ लॅपटॉपशी जोडलेला ठेवतो. असे केल्याने फोन गरम होऊ लागतो. कधीकधी फोन जास्त गरम होऊ लागतो, ज्यामुळे बॅटरीवर परिणाम होतो आणि ती खराब देखील होऊ शकते.
जर तुमचा लॅपटॉप बॅटरीवर चालत असेल आणि तुम्ही त्यावरून तुमचा फोन चार्ज करत असाल तर त्याची बॅटरीही लवकर डिस्चार्ज होऊ लागेल. एवढेच नाही तर त्यामुळे लॅपटॉपची बॅटरी लाईफ देखील कमी होऊ शकते.