विश्वसंचार

‘चांद्रयान-3’ नंतर होणार ‘मंगळयान-2’ मोहीम

Pudhari News

बंगळूर :

भारतीय अवकाश संशोधन संस्था 'इस्रो'ने आता 'मार्स ऑर्बिटर मिशन-2' च्या पुढील योजनेची घोषणा केली आहे. त्यानुसार मंगळावर आणखी एक ऑर्बिटर पाठवले जाणार आहे. यापूर्वी भारताने 'मंगळयान-1' यशस्वीरीत्या मंगळावर पाठवले होते. एखाद्या अन्य ग्रहावर यान पाठवण्याची ही भारताची पहिलीच मोहीम होती. आता 'मंगळयान-2' ही मोहीम 'चांद्रयान-3' नंतर सुरू होईल, अशी माहिती 'इस्रो'चे प्रमुख के. सिवन यांनी दिली आहे. 

'मंगळयान-2' हे रोव्हर असेल की मंगळाभोवती फिरणारे ऑर्बिटर असेल असे विचारले असता सिवन यांनी सांगितले की सध्या आम्ही ऑर्बिटर मोहिमेबाबतच विचार करीत आहोत. 'मंगळयान-2' ही केवळ ऑर्बिटर मिशनच असेल. 'मंगळयान-1' हे नोव्हेंबर 2013 मध्ये पाठवण्यात आले होते. ते सप्टेंबर 2014 मध्ये मंगळाच्या कक्षेत जाऊन पोहोचले होते. ते सहा महिने कार्यरत राहण्यासाठी बनवले होते; पण आता सातव्या वर्षातही ते सक्रिय आहे. तुलनेने अतिशय कमी खर्चात राबवलेली ही मोहीम आपल्या पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरली होती. सध्या 'इस्रो' चांद्रयान-3 आणि 'गगनयान' या मोहिमांकडे अधिक लक्ष देत आहे. याच वर्षी डिसेंबरमध्ये 'गगनयान'ची मानवरहीत चाचणी होणार आहे. 'गगनयान' मोहिमेत चार भारतीय अंतराळवीर भारतातच बनवलेल्या अंतराळयानातून अंतराळप्रवास करतील. 'चांद्रयान-3' या वर्षीच्या पहिल्या सहामाहीत कधीही लाँच होऊ शकते. त्यामध्ये 'चांद्रयान-2' प्रमाणेच ऑर्बिटरसह एक लँडर आणि रोव्हरही असणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT