न्यू ऑर्लीन्स : क्षयरोगावरील (टीबी) १०० वर्षे जुनी लस मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये इन्सुलिनचा वापर कमी करू शकते, असा दावा एका नवीन क्लिनिकल चाचणीच्या निकालांमध्ये करण्यात आला आहे. मात्र, या लसीवरील संशोधनाने गेल्या काही वर्षांत मधुमेह संशोधन क्षेत्रात वादालाही तोंड फोडले आहे.
‘बॅसिलस कॅल्मेट-गुएरिन’ (BCG) असे या लसीचे नाव असून, यामध्ये ‘मायकोबॅक्टेरियम बोव्हिस’ (Mycobacterium bovis) या क्षयरोगास कारणीभूत ठरणाऱ्या बॅक्टेरियाची कमकुवत आवृत्ती असते. शरीरात गेल्यावर ही लस या बॅक्टेरियाविरुद्ध संरक्षणात्मक प्रतिसाद तयार करते. विशेष म्हणजे, मूत्राशयाच्या कर्करोगाच्या उपचारासाठीही या लसीला मंजुरी मिळाली असून, ती रोगप्रतिकारकशक्ती वाढवून ट्यूमरवर हल्ला करण्याचे काम करते. मॅसॅच्युसेटस् जनरल हॉस्पिटलच्या डॉ. डेनिस फॉस्टमन यांच्या नेतृत्वाखाली या चाचण्या पार पडल्या. डॉ. फॉस्टमन या अनेक वर्षांपासून वादाच्या केंद्रस्थानी राहिल्या आहेत. सुरुवातीच्या काळात, समीक्षकांनी त्यांच्यावर असा आरोप केला होता की, त्या त्यांच्या संशोधनातून टाईप-१ मधुमेह पूर्णपणे बरा होऊ शकतो, अशी खोटी आशा रुग्णांमध्ये निर्माण करत आहेत. नुकतेच ५ जून रोजी न्यू ऑर्लीन्स येथे पार पडलेल्या ‘अमेरिकन डायबिटीज असोसिएशन’च्या वार्षिक बैठकीत डॉ. फॉस्टमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन नवीन क्लिनिकल चाचण्यांचे निकाल सादर केले.
या निकालांनुसार, ‘बीसीजी’ लस टाईप-१ मधुमेह असलेल्या रुग्णांना फायदा पोहोचवू शकते. मात्र, यामुळे हा आजार पूर्णपणे बरा होत नाही, तर रुग्णाच्या आरोग्याची स्थिती पाहून रक्तातील साखर (ब्लड शुगर) नियंत्रित ठेवण्यास किंवा आजाराचा वेग कमी करण्यास मदत होते. सध्या अमेरिकेत सुमारे २० लाख लोकांना ‘टाईप-१ मधुमेह’ आहे. हा एक ऑटोईम्यून (स्वयं-रोगप्रतिकारक) आजार आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणाच स्वादुपिंडातील इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी नष्ट करते. या रुग्णांना दररोज अनेकवेळा रक्तातील साखरेची तपासणी करावी लागते आणि काळजीपूर्वक मोजून इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते. इन्सुलिनचे प्रमाण जास्त झाल्यास रक्तातील साखर अचानक कमी होऊन चक्कर येणे किंवा फिट येण्याचा धोका असतो. तर, इन्सुलिन कमी पडल्यास साखर वाढून हृदय, किडनी, डोळे आणि नसांचे नुकसान होते. हा आजार जुना झाल्यावर शरीरात इन्सुलिन बनवणाऱ्या पेशी शिल्लक राहत नाहीत. त्यामुळे हा आजार पूर्णपणे बरा करण्यासाठी रोगप्रतिकारक यंत्रणेचा हल्ला थांबवणे आणि पुन्हा इन्सुलिन बनवणाऱ्या पेशी तयार करणे आवश्यक असते, जे अत्यंत कठीण आव्हान आहे.
नव्या संशोधनातून काय समोर आले?
नवीन चाचणीचे निकाल हा आजार पूर्णपणे बरा करत नसल्याचे स्पष्ट करतात. परंतु, यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळू शकतो. या चाचणीमध्ये सामील नसलेल्या न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी लँगोन हेल्थच्या एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. गिलियन गॉडार्ड यांनी सांगितले की, ‘नवीन आकडेवारीवरून असे दिसून येते की, ‘बीसीजी’ लस इन्सुलिनचा प्रतिकार (Insulin Resistance) कमी करू शकते. त्यामुळे प्रौढ वयात किंवा लहान वयात टाईप-१ मधुमेह झालेल्या रुग्णांना लागणाऱ्या इन्सुलिनचे प्रमाण कमी होऊ शकते.’ संशोधक या निकालांकडे एक आशेचा किरण म्हणून पाहत असले, तरी वैद्यकीय क्षेत्रात याच्या पूर्ण प्रभावीपणाबद्दल अद्यापही मंथन सुरू आहे.